`पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सवा`च्या श्रीमुख पत्रिकेचे लोकार्पण


उद्योगपती अरविंद जैन यांच्या हस्ते लोकार्पण; `आया महोत्सव` हे थीम गीत सादर



पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – निगडी येथील श्री 1008 भगवान महावीर अहिंसा ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या `पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सवा’ च्या श्रीमुख पत्रिकेचे लोकार्पण उद्योगपती अरविंद जैन यांच्या हस्ते रविवारी (२४ नोव्हेंबर) निगडी-प्राधिकरण येथे करण्यात आले.

पंचकल्याणक महोत्सवाचे आयोजन येत्या ११ डिसेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत करण्यात आले आहे. याच निमित्ताने पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सवाचे `आया महोत्सव` हे थीम गीत सादर करण्यात आले.
`आया महोत्सव` या थीम गीताची रचना प्रसिद्ध कवी, संगीतकार आणि गायक हर्षित अभिराज यांनी केली आहे. या पत्रिका लोकार्पण कार्यक्रमात हर्षित यांनी या गीताचे सादरीकरण देखील केले.
यानिमित्ताने उद्योगपती अरविंद जैन म्हणाले की, “मंदिरात होणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे समाज एकत्रित येतो. समाजाचे एकत्र येणे ही अतिशय चांगली बाब असून, आपल्याला त्याचा अभिमान आहे. समाज एकसंध राहिल्याने समाजाची ताकद वाढते. यामुळे आपल्या समाजाची ताकद उत्तरोत्तर वाढविण्याच्या दृष्टीने मंदिरासाठी असेच चांगले कार्यक्रम होत राहतील.“ संगीतकार, गायक हर्षित अभिराज यांनी आया महोत्सव हे थीम गीत आपल्यासाठीच तयार केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
`पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सवा`चे थीम गीत सादर करण्याचे भाग्य आपल्याला लाभले आणि ही अमूल्य संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल संगीतकार आणि गायक हर्षित अभिराज यांनी संस्थेचे आभार मानले. या पूर्वी तयार केलेले थीम गीत सादर केल्यानंतर त्यातून आपल्याला सांस्कृतिक प्रेरणा मिळाली आणि या निमित्ताने पुढे अनेक चित्रपटांना संगीत देण्याचे भाग्य लाभले, अशी भावना हर्षित अभिराज यांनी व्यक्त केली. दक्षिण भारत जैन सभा, पुणे येथील अध्यक्ष मिलिंद फड यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
श्री 1008 भगवान महावीर अहिंसा ट्रस्टचे अध्यक्ष अजित पाटील यांनी मंदीराच्या प्रगतीचा लेखा जोखा आपल्या प्रास्ताविकात मांडला. ११ वर्षांनी पंचकल्याणक प्रतिष्ठा कार्यक्रमाचा योग जुळून आला असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त
केला. अजित पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी वीरेंद्र जैन, सुदीन खोत, शांतीनाथ पाटील, उमेश पाटील, धनंजय चिंचवडे, अविनाश भोकरे, विजय भिलवडे, प्रकाश शेडबाळे, सुरगोंडा पाटील आदी पदाधिकारी उपस्थित
होते. उमेश पाटील यांनी आभार मानले.








