च-होलीतून देणार आमदार महेश लांडगे यांना सर्वाधिक मताधिक्य!; च-होलीकरांची ग्वाही
विधानसभा निवडणुकीसाठी ग्रामस्थ, सोसायटीधारकांची वज्रमूठ
महेश लांडगेंच्या पुढाकाराने झालेला विकास आम्ही विसरणार नाही..!
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट झाल्यापासून च-होलीतील समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना येथे मते मागायला येण्याचा नैतिक अधिकारही नाही. महेश लांडगे आमदार झाल्यापासून च-होलीतील विकासाला चालना मिळाली आहे. त्यामुळे आमदार लांडगे यांना सर्वाधिक मताधिक्य च-होलीतून देण्याचा निर्धार च-होलीकरांनी केला आहे. महेश लांडगे हे मागील दोन्ही निवडणुकीपेक्षा जास्त मताधिक्य घेऊन तिसऱ्यांदा आमदार होतील, असा विश्वास च-होलीकरांनी व्यक्त केला.
भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी- आरपीआय व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार महेश लांडगे यांनी च-होली परिसरातील नागरिकांच्या आपुलकीच्या गाठीभेटी घेतल्या. आमदार लांडगे यांनी दत्तनगर, काळीभिंत, वडमुखवाडी, गावठाण, जगताप वस्ती, शिवनगरी, संत रोहिदास नगर, कुंभार गल्ली या परिसरातील नागरिकांच्या गाठीभेटीं घेतल्या. यावेळी भाजपा महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ तसेच सोसायटीधारक उपस्थित होते.
च-होलीसह गावे महापालिकेत समाविष्ट झाल्यापासून विकासापासून कोसो दूर होती. महापालिकेत असूनही नसल्यासारखे होतो. पायाभूत सुविधांची वानवा होती. महेश लांडगे यांनी आमदार झाल्यानंतर समाविष्ट गावांचा विकास करण्यावर भर दिला. आमदार लांडगे यांच्या नेतृत्वाखाली 2017 मध्ये महापालिकेत भाजपची सत्ता आली. त्यानंतर समाविष्ट गावातील नितीन काळजे, राहुल जाधव यांना महापौरपद मिळाले.त्यामुळे विकासाला चालना मिळाली. विकासाचा अनुशेष आमदार लांडगे यांनी भरून काढला, अशा भावना ग्रामस्थांनी बोलून दाखवल्या आहेत.
समाविष्ट गावांमध्ये विकासाची गंगा…
समाविष्ट गावात विकासाची गंगा आली. त्यामुळेच च-होलीसह समाविष्ट गावाचा कायापालट झाला. त्यामुळे च-होलीत मोठ्या मोठ्या गृहनिर्माण संस्था उभारल्या. या भागाची शहराच्या नकाशावर वेगळी ओळख निर्माण झाली आहे. हे केवळ आमदार महेश लांडगे यांच्यामुळेच शक्य झाले. त्यामुळे आम्ही च-होलीकर आमदार लांडगे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिली.