‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाची पुनश्च सुवर्ण कामगिरी,सब-ज्युनिअर रोईंग स्पर्धेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते झाला सन्मान
गोरखपूर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे झालेल्या 25व्या राष्ट्रीय सब-ज्युनिअर रोइंग स्पर्धेत येथील एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्या डाॅ.विश्वनाथ कराड एमआयटी क्रीडा अकादमीच्या खेळाडूंनी सुवर्ण कामगिरी करताना विद्यापीठाच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा खोवला.
विद्यापीठाच्या कार्तिक कांबळे, प्रथमेश कांदे, श्रेयस गर्जे व वैभव लाड यांनी महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना “बॉईज फोर” या प्रकारात सुवर्णपदकाला गवसनी घातली. स्पर्धेत देशभरातील एकूण 19 राज्यसंघांनी सहभाग नोंदवला होता. या सुवर्णपदकानंतर पारितोषिक वितरण समारंभात त्यांचा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री तथा भाजप नेते योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते करंडक, बक्षिस व मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. कु.कार्तिक अंगद कांबळे (वय-14) डाॅ.विश्वनाथ कराड एमआयटी क्रीडा अकादमीत विद्यापीठाचे राष्ट्रीय रोइंग प्रशिक्षक संदीप भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तीन वर्षांपासून नौकानयनाची तयारी करत आहे. त्याच्या जडणघडणीत एमआयटी एडीटी विद्यापीठाचाही वाटा मोठा आहे.
या कामगिरीनंतर विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा कुलगुरू प्रा.डाॅ.मंगेश कराड, कार्यकारी संचालक प्रा. डाॅ.सुनीता कराड, प्र.कुलगुरू डाॅ.रामचंद्र पुजेरी, डाॅ.मोहित दुबे, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, क्रीडा विभाग संचालक प्रा.पद्माकर फड, विद्यार्थी कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक डाॅ.सुराज भोयार यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.