शंकर जगताप यांच्या उमेदवारीचा सर्वात जास्त आनंद मला – आमदार अश्विनी जगताप
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भाजपने शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जगताप कुटुंबात आनंदच वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून आमदार अश्विनी जगताप आणि शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्यात उमेदवारीवरून कलह असल्याचं बोललं जात होतं. यावर अश्विनी जगताप यांनी पडदा टाकत आमच्या दोघांमध्ये कुठलाही कलह नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आता राज्यात घडामोडींना वेग आला आहे.चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीनंतर आमदार झालेल्या अश्विनी जगताप यांना तिकीट न देता, त्यांचे दिर शंकर जगतापांना तिकीट देण्यात आलेलं आहे.
उमेदवारी निवडीबाबत शंकर जगताप यांची प्रतिक्रिया म्हणाले, आमच्यामध्ये कौटुंबिक किंवा राजकीय असा कोणताच वाद नव्हता. आमचं एकत्र कुंटूब आहे, होतं आणि ते कायम राहणार आहे. मी माझी उमेदवार म्हणून निवड केल्याबद्दल सर्वांचं आभार मानतो. अनेक इच्छुकांमध्ये माझी निवड केली, काही इतर उमेदवार देखील इच्छुक होते, आताही आहेत. महायुतीत बंडखोरी होणार नाही. सर्वजण एकत्रित येऊन आम्ही लढू. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी आधिपासून काही ठरवलेले नियम होते, ज्यांच्याकडे जो मतदारसंघ होता, त्यांना त्या जागा मिळाल्या आहेत. बंडखोरी होऊ न देता सर्व नेत्यांना एकत्रित घेऊन काम करण्याचा प्रयत्न करू असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
अश्विनी जगताप म्हणाल्या, घरातच तिकिट मिळालं आहे.घरापासूनच आता प्रचाराला सुरूवात करायची आहे. त्यामुळे खंत नाही, वाद नाही. मी आधीही सांगितलं होतं ज्याला उमेदवारी मिळेल त्याचा प्रचार करेन असं त्यांनी म्हटलं आहे.