चिंचवडमधून अरुण पवार यांचे भाजपसमोर तगडं आव्हान मनोज जरांगे पाटीलांचे आश्वासन, ‘तुम्ही फॉर्म भरा, मी सोबत आहे’
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मनोज जरांगे पाटील यांनी वृक्षमित्र अरुण पवार यांना ‘चिंचवड विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहा, मी तुमच्या सोबत आहे,’ असे आश्वासन दिल्याने अरुण पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. आपलं काम, चिंचवड मतदारसंघातील मराठवाडा, विदर्भ, कोकण रायगड , खानदेश, जुन्नर आदिवासी समाज आंबेगाव वासियांचा , पश्चिम महाराष्ट्र ,बिदर कर्नाटक असा पिंपरी चिंचवड शहरामध्ये खूप मोठा जनसमुदाय आहे आणि त्यांच्याशी अरुण पवार यांचे जिव्हाळ्याचे ऋणानुबंध आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत यांचा ही पाठिंबा आणि मनोज जरांगे पाटील यांचे समर्थन यामुळे मोठ्या मताधिक्याने आपला विजय निश्चित आहे, असा ठाम विश्वास अरुण पवार यांना आहे.
आपल्या उमेदवारीबद्दल बोलताना अरुण पवार यांनी सांगितले, की विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालन्यातील अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाची बैठक घेतली. या बैठकीत मनोज जरांगेंनी मराठा बांधवांशी संवाद साधत विधानसभा निवडणूक लढण्याबाबत निर्णय घेतला. जिथं निवडून येऊ शकतो, अशाच मतदारसंघात उमेदवार द्यायचा. जिथं निवडून येऊ शकत नाही. त्या ठिकाणी आपल्या मागण्या मान्य असणाऱ्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा, असा निर्णय मनोज जरागे पाटील यांनी घेतला आहे. त्याचवेळी आपणास चिंचवड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितला आहे. जरांगे पाटील स्वतः प्रचारासाठी येणार आहेत.
अरुण पवार दरवर्षी झाडांना पाणी देऊन जतन करण्याचा उपक्रम हाती घेतात. या उपक्रमांतर्गत गेल्या १२ वर्षापासून संस्थेने रोपण केलेल्या राज्यभरातील वृक्षांना टँकरद्वारे पाणी देण्यात येते. चारा पाण्यावाचून हरीण, माकडे, कोल्हे, लांडगे तसेच पक्ष्यांना पाण्यावाचून जीव गमवावा लागत आहे, हे जाणून मराठवाडा जनविकास संघाच्या माध्यमातून अरुण पवार यांनी चारा पाण्याची व्यवस्था केली आहे. दुष्काळग्रस्त अशा मराठवाड्यातील तुळजापूर, उस्मानाबाद, लातूर या पट्ट्यात वन्य प्राण्यांसाठी 107 पाण्याच्या टाक्या बांधल्या आहेत. एवढेच नाही तर संपूर्ण उन्हाळ्यात या टाक्यांमध्ये टँकरद्वारे पाणी टाकण्याचे काम अरुण पवार करीत आहेत. दुष्काळग्रस्त भागातील वन्य पशू पक्ष्यांना पाणी पुरविण्यासोबतच लोकांनाही मोफत पाणी पुरविण्याचे काम ते करीत आहेत.
अरुण पवार यांनी आपले शिक्षण गरीबीतून पूर्ण केले, याची जाणीव ठेवून समाजातील गरीब विद्यार्थ्यांना ते मदत करीत आले आहेत. आपण मोठे झालो, तरी गरीबीची जाणीव त्यांनी ठेवली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये मराठवाड्यातील लाखो लोक राहतात. त्यांच्यात समन्वय साधण्याचे काम करून त्यांच्या अडीअडचणी, सुखदु:खात ते सहभागी होतात. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ते करीत असलेले वृक्षारोपणाचे कार्य खूप मोलाचे आहे. पंढरीच्या वारकर्यांची ते दरवर्षी सेवा करीत आहेत. त्यांना फळ वाटप, जेवण, पालखी सोहळ्यासोबत पाण्याचे टँकर देणे. महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री सहाय्यता निधी २ वेळा आदी सेवा ते मनोभावे करीत आहेत. त्यांनी हलाखीच्या परिस्थितीतून येऊन बांधकाम क्षेत्रात नावलौकिक मिळविलाच; शिवाय पर्यावरण, सामाजिक, पारमार्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रात नाव कमावले आहे. गरजू लोकांना विविध प्रकारे मदत करीत त्यांच्या जीवनात आनंद आणण्याचे काम त्यांनी केले आहे.
आज समाजामध्ये अनेक लोक असे आहेत जे संघर्ष करून मोठे होऊन सुखाचे आयुष्य जगतात. मात्र, त्या संघर्षाची जाणीव ठेवून समाजासाठी काम करणारा अरुण पवार यांचा स्वभाव आहे. कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांना केलेली अन्नधान्यरुपी मदत खूप मोलाची होती. अंध अपंग, विद्यार्थी यांना नेहमीच सढळ हाताने मदत करीत आले आहेत.
मराठवाड्यातून पिंपरी चिंचवड शहरात स्थायिक झालेल्या लोकांसाठी मराठवाडा भवन असावे, ही अरुण पवार यांची इच्छा आहे. त्यासाठी त्यांनी स्वतःची पिंपळे गुरव या ठिकाणची १० गुंठे जागा दिली असून, लवकरच मराठवाडा भवनच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. त्यामुळे अरुण पवार म्हणजे मराठवाडावासियांचे चालते बोलते व्यासपीठ आहे. गरजू विद्यार्थी, गरीबांना आर्थिक मदत करणे, हे दातृत्व आहे.
पुण्यासारख्या शहरात स्थायिक होऊन अरुण पवार यांनी बांधकाम क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात मोठे नाव कमावले आहे. पर्यावरण, महिला सक्षमीकरण, धार्मिक क्षेत्रात ते अतूलनीय काम करीत आहेत. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन सोहळा, देहू आळंदी स्वच्छता अभियान, मराठवाड्यातील बांधवांची नावनोंदणी, मोफत पाणी पुरवठा, मुक्या प्राण्यांना अन्न पाणी पुरवठा, गडकिल्ले संवर्धनासाठी मदत आदी कामे उल्लेखनीय आहेत.
अरुण पवार यांना समाजमनाची जाणीव आहे. त्यांनी आपलं सर्वस्व समाजकार्यात व्यापून टाकलं आहे. कलाकारांना कला जपण्यात अडचणी येतात. मात्र, अरुण पवार यांच्यासारखे लोक कलाकारांना प्रोत्साहन देऊन त्यांना भरारी घेण्याची उम्मेद देतात. ज्यांच्यामध्ये काहीतरी करण्याची उर्मी असते, त्यांना मन शांत बसू देत नाही.