ताज्या घडामोडीपिंपरी

फेरीवाल्यांच्या हक्काचे काम करणाऱ्या पॅनलला विजयी करा – काशिनाथ नखाते

Spread the love
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून महाराष्ट्र फेरीवाला क्रांती, महासंघ कष्टकरी संघर्ष महासंघ या संघटनाच्या माध्यमातून शहरातील कष्टकरी वर्ग, पथारी, हातगाडी, टपरीधारक यांच्या न्यायहक्काची लढाई आम्ही लढलेली आहे. आमच्या लढाईमुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात हॉकर्स झोन निर्माण केले तर ६५ ठिकाणी हॉकर झोन प्रस्तावित असून २०१४ नंतर ५९०० विक्रेत्यांना फेरीवाला प्रमाणपत्र देण्यात आले आहे. यापुढेही खूप मोठ्या प्रमाणात काम करण्यासाठी सर्व पथारी, हातगाडी, टपरीधारकांनी आपल्या संघटनेच्या सर्व उमेदवारांना कपबशी या चिन्हावर शिक्का मारून प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन महासंघाचे अध्यक्ष तथा कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केले.
        पिंपरी चिंचवड महानगरपालिका पथविक्रेता समिती निवडणूक २०२४ जाहीर झाली असून रविवारी (दि. २० ऑक्टोबर) सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत आपल्या क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत असणाऱ्या नियोजित मनपा शाळांमध्ये मतदान होणार आहे. या निवडणुकीत १५ हजार पेक्षा जास्त मतदारांना आठ जागांसाठी मतदान करता येणार आहे. अशी माहिती नखाते यांनी सोमवारी चिंचवड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उमेदवार प्रल्हाद रामभाऊ कांबळे, किरण श्रीधर साडेकर, राजू विलास बिराजदार, संगीता दत्तात्रय शेरखाने, किसन रामा भोसले, सलीम बाबालाल डांगे, अलका सुनील रोकडे आदी उपस्थित होते.
     प्रल्हाद कांबळे यांनी सांगितले की, शहरात सर्व भागात नियोजित हॉकर झोन निर्माण करण्यासाठी, फेरीवाला प्रमाणपत्र, ओळखपत्रासाठी, न्याय हक्कासाठी, अतिक्रमण कारवाईस विरोध करण्यासाठी, सुसज्ज भाजी – फळे मंडई साठी आणि मनपा व पोलीस प्रशासनाची दंडुकेशाही रोखण्यासाठी आमच्या पॅनलच्या सर्व उमेदवारांना कपबशी चिन्हावर शिक्का मारून बहुमताने विजयी करावे असे आवाहन केले.
महासंघाने आतापर्यंत केलेल्या कामाविषयी माहिती देताना नखाते यांनी सांगितले की, नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ, कष्टकरी संघर्ष महासंघ, फेरीवाला हॉकर्स महासंघाच्या सुमारे २२ वर्षापासून लढणाऱ्या संघटनांचे अधिकृत उमेदवार हे आहेत. त्यांच्या न्याय हक्काच्या लढाईसाठी अनेक वेळा संघर्ष केलेला असून प्रसंगी अनेक वेळा ते तुरुंगामध्ये गेलेले आहेत. वेळोवेळी आम्ही संघर्ष करून अनेक निर्णय प्रशासनाकडे पाठपुरावा करून घेतलेले आहेत. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये पथारी, हातगाडी, टपरी धारकांचे सन २०१२ आणि २०१४ मध्ये संघटनेच्या माध्यमातून पाठपुराव्यातून सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर ५९०० विक्रेत्यांना लायसन वाटपाची प्रक्रिया झाली. आताही आम्ही केलेल्या प्रयत्नातून सर्वेक्षण झालेले आहे. त्यानंतर आता सर्व क्षेत्रीय कार्यालयामध्ये १४०० रू. शुल्क आकारणी सुरू आहे. त्या सर्व विक्रेत्यांना ओळखपत्र व फेरीवाला प्रमाणपत्र मिळणार आहे. आम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून निगडी येथे सुसज्ज असे हॉकर्स झोन, खाऊ गल्ली केलेली असून भक्ती शक्तीसह इतर ठिकाणी हॉकर झोनची निर्मिती करण्यात यश आलेले आहे. पुढील कालावधीमध्ये सुसज्ज भाजी मंडई व फेरीवाल्याचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या न्यायासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.
     यावेळी महासंघाचे पदाधिकारी व तुषार घाटूळे, बालाजी लोखंडे, यासीन शेख, नाना कसबे, संभाजी वाघमारे, मनोज यादव, तुकाराम माने, लाला राठोड, लक्ष्मण शेरखाने, प्रवीण वाघमारे, महबूब मुल्ला, गौतम रोकडे, परमेश्वर बिराजदार, रशीद शेख, नंदा रोकडे, दीपक आरगडे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button