सच्चा देशभक्त उद्योजक आपण गमावला
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा हे उद्योग विश्वातील एक रत्न होते. टाटा समूहाची धुरा त्यांनी उदारीकरणाच्या पार्श्वभूमीवर स्वीकारली. उद्योगांना लायसन्स राज मधून बाहेर काढत प्रगती पथावर नेले. एकूण बेचाळीस कंपन्या चालवत सॉल्ट ते सॉफ्टवेअर अशा सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी भरारी घेतली. यातील सर्व उद्योग हे केवळ नफ्यासाठी न चालवता राष्ट्राच्या उभारणीस हातभार लावला. समाजाभिमुखता, साधी राहणी, दातृत्व, देशप्रेम अशा विविध गुणांचा समन्वय साधणारा एक मोठ्या मनाचा माणूस आपण गमावलेला आहे. रतन टाटा यांचे व्यक्तिमत्व हे सर्वव्यापी होते . समाजातील सर्व स्तरावरील लोकांच्या आदरास प्राप्त झालेले होते. त्यांचे श्वानप्रेम आणि भूतदया ही सर्वश्रुत आहे. कामगार त्यांना देवासमान मानतात. त्यांनी मिळवलेल्या पैशातील पासष्ट टक्के भाग हा समाजाप्रती समर्पित करत असत. रतन टाटा यांच्या जाण्याने एक मोठ्या मनाच्या माणसाला आणि सच्चा देशभक्ताला आपण मुकलेलो आहोत.” ……असे प्रतिपादन शिवतेज नगर येथे विविध वक्त्यांनी केलेआहे.
शिवतेज नगर येथील स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या वतीने नागरिक आणि कामगार वर्गाच्या उपस्थितीत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, व्याख्याते आणि माजी सरव्यवस्थापक राजेंद्र घावटे, जेष्ठ नागरिक महासंघाचे सचिव प्रा. हरिनारायण शेळके, राजू गुणवंत, प्रभाकर शेवते, राजेंद्र केंजळे आदी वक्त्यांनी श्रद्धांजली पर मनोगत व्यक्त केले. राजाराम सावंत यांनी सूत्रसंचालन केले . क्षमा काळे, शोभा नलगे, ज्ञानेश्वर नारखेडे, मंगेश पाटील , मेघराज बागी, रोहन नंदनवार, बाबासाहेब यादव, बबन पाटील यांनी संयोजन केले.