उद्योजकता क्षेत्रातील नवदुर्गा – डॉ. क्षमा महेश धुमाळ
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – सौंदर्यप्रसाधन आणि सौंदर्योपचार व्यवसायाला जेव्हा कलात्मक दृष्टिकोनाची जोड लाभते, तेव्हा एका ब्युटीपार्लर पासून सुरू केलेला प्रवास स्वतःच्या क्लिओपात्रा ब्युटी स्टुडिओ अँड इन्स्टिट्यूट पर्यंत कसा जाऊन पोहोचतो. याचा आदर्श वस्तूपाठ आहेत, डॉ. क्षमा महेश धुमाळ. या इन्स्टिट्यूट मधून अनेक महिला उद्योजक घडवण्याचे मोलाचे कार्य त्या करत आहेत.
क्षमा यांचा जन्म जुन्नर या त्यांच्या आजोळी झाला. त्यांचे वडील सुभाष शिंदे हे इन्कम टॅक्स ऑफिसर आणि आई सौ. सुनीता या मुंबई महानगरपालिकेत नगरसेविका तसेच सिद्धिविनायक मंदिराच्या ट्रस्टी म्हणून कार्यरत होत्या. मुलांनी शिक्षण क्षेत्रात प्रगती करावी यासाठी ते प्रयत्नशील होते. पूर्णिमा, मीनल आणि सुशांत या मुलांनी शिक्षण क्षेत्रात उत्तम नावलौकिक प्राप्त केला. मात्र क्षमा यांना लहानपणापासून कलेची आवड तसेच नवनवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता होती. म्हणून त्यांनी ब्युटी पार्लर, मेकअप, फॅशन डिझाइनिंग तसेच जे. जे. स्कूल ऑफ आर्टस मधून इंटेरियरचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांचे चिंचवड येथे स्थायिक असलेले व्यावसायिक श्री. महेश बाळकृष्ण धुमाळ यांच्याशी लग्न झाले. त्यानंतर एकत्रित कुटुंबामधील जबाबदाऱ्या, एका मुलीचा जन्म आणि घरचा व्यवसाय सांभाळण्यात त्या व्यग्र झाल्या.
पण मुळातील कलेची आवड आणि स्वतःला सिद्ध करण्याची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती, म्हणून त्यांनी घरी ब्युटीपार्लर सुरू केले. त्यांच्यातील जिद्द, मेहनत, कामावरील निष्ठा आणि कुशलता, कलात्मक दृष्टिकोन, उत्तम संभाषण कौशल्य, प्रसन्न देहबोली यातून त्यांनी स्वतःचा ग्राहक वर्ग निर्माण केला. या दरम्यान चिंचवड, पुणे, मुंबई मध्ये जाऊन या क्षेत्रातील सखोल ज्ञान घेण्यासाठी विविध कोर्सेस केले. दुबईमधील लंडन कॉलेजच्या शाखेमधून त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरचे सर्टिफिकेट प्राप्त केले. या क्षेत्रात स्वतःला त्या सतत सिद्ध करत राहिल्या आणि अद्ययावत ज्ञान घेत राहिल्या.
२००८ साली संपन्न झालेल्या सौंदर्य स्पर्धेत आत्मविश्वासाचे आणि सौंदर्याचे तेज असलेल्या या बुद्धिमान सौंदर्यशालिनीला ‘मिसेस पिंपरी चिंचवड’ हा किताब लाभला. आणि हे त्यांच्या जीवनातील महत्त्वाचे वळण ठरले. सौंदर्योपचार क्षेत्रातील विविध मानसन्मान लाभले तसेच विविध फॅशन शोमध्ये त्यांनी मार्गदर्शन करायला प्रारंभ केला. त्यातूनच ‘श्रावणपरी’ हा इव्हेंट त्यांनी सुरू केला.
२००८ मध्ये त्यांनी क्लिओपात्रा ब्युटी इन्स्टिट्यूटची स्थापना केली. सुरुवातीला भाडेतत्त्वावर छोटी जागा घेऊन सातत्याने विस्तार करत त्यांनी लिंक रोडला स्वतःच्या प्रशस्त जागेत विद्यार्थिनींना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक स्तरातून येणाऱ्या विद्यार्थिनींच्या समस्या समजावून घेऊन वैयक्तिक सल्ला देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवला. फक्त सौंदर्य उपचारामधील ज्ञान न देता व्यावहारिक जगात पाय रोवून उभे राहायला शिकवले . त्यांच्या इन्स्टिट्यूट मधून प्रशिक्षण घेतल्यानंतर आज याच विद्यार्थिनी समर्थपणे स्वतःचा व्यवसाय करत आहे. अशा प्रकारे त्यांनी महिला उद्योजक घडवण्याचे मोलाचे कार्य त्यांच्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून केले आहे.
महिलांनी ब्युटी ट्रीटमेंट घेतल्यानंतर सौंदर्याबरोबर व्यक्तिमत्व देखील खुलून येते, आत्मविश्वास वाढतो व आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक होतो, ज्याचा आपापल्या क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी उपयोग होतो. म्हणूनच आजच्या आधुनिक युगात या क्षेत्राला महत्त्व प्राप्त झाले आहे. असे त्या नमूद करतात.
कोरोना काळात कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सेवाभावी क्षेत्रात येणारे ब्युटी पार्लर बंद ठेवावे लागले. या काळात मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून त्यांनी या क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान मिळवण्यासाठी विविध ऑनलाईन कोर्सेस केले. याच दरम्यान त्यांच्या मनात पीएचडी करण्याचा विचार आला. त्यासाठी ऑनलाईन प्रवेश परीक्षा दिल्या. वेळोवेळी प्रत्यक्ष अनुभवातून मिळवलेल्या ज्ञानाच्या नोंदी त्यांनी ठेवल्या होत्या त्याचा इथे उपयोग झाला. आणि त्यांनी पीएच.डी.चे लेखन पूर्ण केले. अमेरिकेतील Hemden University मध्ये त्यांनी पीएच.डी केली. पूर्वीच्या काळी वेगवेगळ्या देशात कोणती सौंदर्य प्रसाधने वापरत असत, विविध वनस्पतींची पाने,फुले,फळे या नैसर्गिक गोष्टी वापरून सौंदर्य प्रसाधन केले जात असे. आता याच नैसर्गिक गोष्टींवर प्रक्रिया करून वेगवेगळी सौंदर्य प्रसाधने तयार केली जातात. प्रगत तंत्रज्ञानामध्ये हाय डेफिनेशन मेकअप पर्यंतचा अभ्यास त्यांनी केला. आणि डॉक्टरेट पदवी प्राप्त केली.
सहजसुंदर संवाद साधण्याची शैली, कामावरील श्रद्धा, ध्येयपूर्तीसाठी अखंड परिश्रम करणारे, मार्गात आलेल्या अडथळ्यांवर मात करून आपले ध्येय साध्य करणारे व कला क्षेत्रात रमणारे हे कर्तृत्वसंपन्न व्यक्तीमत्व आहे. यातूनच त्यांनी या क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. २०१९ च्या नारीशक्ती पुरस्काराने तसेच विविध पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.
या प्रवासात त्यांचे पती महेश यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून त्यांना पुढे जाण्यासाठी कायम प्रोत्साहित केले. प्रेमळ सासू- सासर्यांनी मुलीचे उत्तम संगोपन केले. तसेच सासर माहेरच्या सर्वांनी त्यांना पाठबळ दिले. त्यांची मुलगी अस्मि हिला आपल्या कर्तबगार आईचा अभिमान वाटतो. या सगळ्यांबद्दल त्या कृतज्ञता भावना व्यक्त करतात.
या क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर मेहनतीला पर्याय नाही. सखोल ज्ञानाबरोबर कलात्मक दृष्टिकोन जोपासयला हवा. आपले ज्ञान अद्ययावत ठेवायला हवे, आपल्या कामावर आणि ध्येयावर निष्ठा ठेवली तर नक्कीच या क्षेत्रात यशस्वी व्हाल असे त्या सांगतात.
त्यांच्या या अतुलनीय यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेण्यासाठी तसेच निरामय आनंदी जीवनासाठी खूप शुभेच्छा.
लेखन – माधुरी शिवाजी विधाटे