अध्यात्मिक क्षेत्रातील नवदुर्गा – ह.भ.प.सुचेता (माई महाराज) सुरेश गटणे
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – अध्यात्मिक क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तीमत्व म्हणजेच ह.भ.प. सौ. सुचेता (माई ) सुरेश गटणे आहेत.
माई म्हणजेच विजया अनंत देखणे यांचा जन्म २३ जुलै १९५४ रोजी पुणे जिल्ह्यातील शिरूर लगतच्या कारेगाव या लहानशा गावात झाला.
ह. भ. प. अनंत देखणे हे कीर्तन परंपरेतील मान्यवर व्यक्तिमत्व व त्यांच्या पत्नी इंदिराबाई या वारकरी दांपत्याच्या घरी त्यांचा जन्म झाला. बंधू रामचंद्र आणि भगिनी संजीवनी यांच्या समवेत कीर्तन परंपरेत त्यांच्या बालमनावर संत साहित्याचे उत्तम संस्कार घडले. आई-वडिलांना शिक्षणाची अतिशय आवड असल्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतून शेजारच्या गावी शिक्षणासाठी पाठवून त्यांनी विजया यांना जुन्या काळातील मॅट्रिक म्हणजे अकरावीपर्यंत शिक्षण दिले. आणि त्यांचा दौंड तालुक्यातील वारकरी परंपरेतील सुरेश विष्णुपंत गटणे यांच्याशी विवाह करून दिला. लग्नानंतर विजया यांचे नाव सुचेता झाले. लहान वयात लग्न झाल्यानंतर दोन मुलांच्या जन्मानंतर त्यांनी सासूबाईं श्रीमती लक्ष्मीबाई यांच्याकडे शिकण्याची इच्छा प्रदर्शित केली. त्यांनीही मोठ्या मनाने परवानगी दिली.
त्यानंतर त्यांनी एस.एन.डी.टी. विद्यापीठात बी.ए. केले आणि पुणे विद्यापीठात एम.ए. केले. सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडत, दोन लहान मुलांचे संगोपन करत त्यांनी उच्च शिक्षण घेतले. या सर्व प्रवासात त्यांना त्यांच्या अतिशय मायाळू सासूबाई श्रीमती लक्ष्मीबाई, पती सुरेश आणि सासर माहेरचे कुटुंबीय यांनी प्रेमळ साथ आणि पाठिंबा दिला.
दौंड मध्ये एका बाजूला राही आणि दुसऱ्या बाजूला रुक्मिणी आणि मध्ये पांडुरंग असे पंढरपुरा सम भीमेच्या काठावरील वैशिष्ट्यपूर्ण हेमाडपंथी मंदिर आहे. असे मंदिर महाराष्ट्रात अन्यत्र कुठेही नाही. गटणे कुटुंबीय या मंदिराचे वंशपरंपरागत पुजारी आहेत. त्यामुळे माहेराप्रमाणे सासरी देखील संपन्न असा हा अध्यात्मिक वारसा त्यांना लाभला. सुचेता ताईंच्या वयाच्या २८ व्या वर्षी त्या सांसारिक जबाबदाऱ्यातून थोड्या मोकळ्या झाल्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांना सांप्रदायिक कीर्तन करायला शिकवले. मुळातच तल्लख बुद्धीच्या आणि अध्यात्मिक जडणघडण झालेल्या सुचेता ताईंनी हे आध्यात्मिक संस्कार लवकरच आत्मसात केले. त्यांचे बंधू रामचंद्र हे लोककलेचे आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि भारूडकार डॉ. रामचंद्र देखणे होत. त्यांनाही कीर्तन परंपरेत माईंनी मोलाचे मार्गदर्शन केले. त्या अतिशय उत्तमरित्या कीर्तन करू लागल्या. त्यांच्या मधुर आवाजातील आणि रसाळ शैलीतील कीर्तन ऐकण्यासाठी हरिभक्त जमा होऊ लागले.
‘मला दादला नको ग बाई’ यासारख्या स्त्रीप्रधान भारुडांचे अर्थासह निरूपण हे त्यांचे वैशिष्ट्य ठरले. या भारुडांमधून त्या सांप्रदायिक तत्वज्ञान सांगत असत. डॉ. रामचंद्र देखणे यांच्यासोबत दोन हजार कीर्तन व भारुडांचे निरूपण त्यांनी केले आणि स्वतंत्ररित्या जवळजवळ एक हजार भारुडांचे आणि कीर्तनाचे रसाळ निरूपण त्यांनी केले. १९९५ साली त्यांनी पहिल्या महिला वारकरी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करून वारकरी संप्रदायात क्रांती घडवून आणली आणि त्यांचे अनुकरण पुढे अनेक ठिकाणी झाले.
अध्यात्मिक विषयांवरची त्यांची पाच पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यापैकी वारीच्या वाटेवरची माहिती सांगणारे ‘माझे माहेर पंढरी’ हे पुस्तक अतिशय माहितीपूर्ण ठरले आहे. अंगणातील रांगोळीची परंपरा दर्शवणारी ‘चैत्रांगण’ ही सचित्र पुस्तिका आहे. चैत्रांगण या कार्यक्रमाचे संशोधनात्मक लेखन करून त्याचे सचित्र निरूपण केले आहे. तसेच ‘काकड आरती गाणी संग्रह’ या पुस्तकात काकड्याची पारंपारिक गाणी आणि त्यांची स्वलिखित गाणी यांचा अंतर्भाव आहे. ‘नर्मदा प्रदक्षिणेच्या वाटेवरील तीर्थक्षेत्रे’ हा तेथील स्थानिक हिंदी पुस्तकाचा अनुवाद अतिशय माहितीपूर्ण ठरला आहे व त्याला भाविकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला आहे. ‘शुभकार्य व इतर पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू आणि त्यांचे महत्त्व’ हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. या सर्व लेखनामागे परंपरेने जे चालत आले आहे, ते लोकांपर्यंत पोचवावे आणि हा वारसा जतन करावा ही भावना आहे. अशाप्रकारे त्यांचे आध्यात्मिक आणि लोकसाहित्यामध्ये मोलाचे योगदान आहे. विविध मानाच्या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.
१९८१ सालापासून त्या पंढरीची पायी वारी करत असत. यातूनच ‘संत विचार प्रबोधिनी’ ही दिंडी त्यांनी सुरू केली. दिंडीतील लोक सोबत घेऊन त्या संतांच्या गावाला पारायण करतात. संत तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी पारायण, नामदेव गाथा, दासबोध इत्यादी ग्रंथांची पारायण त्या करतात. ज्ञानेश्वरीची १०८ हून अधिक पारायणे झाली आहेत.अशा प्रकारे महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरही साधारणपणे ७० ठिकाणी तसेच मॉरिशस येथे देखील त्यांनी पारायणे केली आहेत. यानिमित्ताने विविध ठिकाणी त्या संतपरंपरेशी व तेथील अध्यात्मिक व्यक्तींशी जोडल्या गेल्या आहेत. आणि संत साहित्याचा प्रसार त्यांनी केला आहे.
या दिंडीच्या आयोजनात त्यांचे पती सुरेश , मुले सचिन आणि शंतनु आणि कविता व प्राची या स्नुषा तसेच नातवंडे देखील मनापासून मदत करतात. आणि सर्व व्यवस्थापन बघतात. अशा प्रकारे संत साहित्याचा, कीर्तन परंपरेचा हा संपन्न अध्यात्मिक वारसा हे कुटुंब पुढे नेत आहे. भोईर नगर चिंचवड येथे त्या वास्तव्याला आहेत.
वडिलांची म्हणजे स्वर्गीय डॉ. रामचंद्र देखणे यांच्या लोककला आणि कीर्तन परंपरेची पताका खांद्यावर घेऊन पुढे मार्गस्थ असलेला, संत ज्ञानेश्वर संस्थानाचे पदाधिकारी असलेला, लोककलेविषयी अनेक, शासकीय पदे भूषविणारा माई महाराजांचा भाचा डॉ. भावार्थ देखणे आणि माईंची दोनही मुले सचिन – शंतनु हे त्यांच्या स्मृतीचिन्हाच्या व्यवसायामध्ये तर आहेच आहे. पण जगण्यामध्ये सुद्धा माई महाराजांचा भक्कम आधार, मार्गदर्शनामुळे, ऋणाईत आहे म्हणून मोठ्या गौरवाने सांगत असतात.
कुठल्याही गोष्टीचा अभिमान न बाळगता सर्व काही माऊलीच करून घेतात, जे पूर्व संचित आहे त्या पुण्यावर मार्गक्रमणा चालू आहे. अशी जीवनाविषयी कृतज्ञ भावना त्या व्यक्त करतात. कोणाशी सहज बोलताना सुद्धा त्यांनी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरार्थ माई महाराजांच्या तोंडी ज्ञानोबा, तुकोबा, एकनाथ महाराज, बहिणाबाई, कान्होपात्रा, मुक्ताबाई यांचे अभंग प्रमाण म्हणून असतात.सगळी संत परंपरा आणि “एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम” या संत उक्तीप्रमाणे धर्म ,धार्मिकता, परंपरा, सण, व्रत वैकल्ये, यामध्ये कुठलीही अंधश्रद्धा न बाळगता त्यांचे जतन कसे करावे हे माईं महाराजांच्या सहवासात येऊन प्रत्येकाला कळेल.
सर्वांशी आपुलकीने वागणाऱ्या, मनमिळाऊ स्वभावाच्या, शिस्तप्रिय, देवघरात तेवणाऱ्या समई सारख्या स्निग्ध व्यक्तीमत्त्वाच्या, संत साहित्याचा आणि लोक साहित्याचा व्यासंग बाळगणाऱ्या माई, त्यामुळेच अध्यात्मिक क्षेत्रातील एक वंदनीय व्यक्तिमत्त्व ठरले आहे. लवकरच त्यांचा अमृत महोत्सव संपन्न होईल.
त्यांच्या उत्तुंग अशा आध्यात्मिक कार्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या चरणी विनम्र भावे वंदन.तसेच निरामय आनंदी दीर्घायुष्यासाठी खूप शुभेच्छा.
लेखन- माधुरी शिवाजी विधाटे