ताज्या घडामोडीनवरात्री विशेषपिंपरी

शैक्षणिक क्षेत्रातील नवदुर्गा – डॉ. नूतन लोणकर नेवसे

Spread the love

 

पिंपरी चिंचवड मधील नवदुर्गांचा”

डॉ.नूतन लोणकर नेवसे

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे बंधू सिदूजी खंडोजी नेवसे पाटील यांच्या घराण्यातील पाचव्या पिढीतील कन्या पूर्वाश्रमीच्या मीना रघुनाथ नेवसे म्हणजेच  मीना विष्णू लोणकर यांच्या पोटी २३ जुलै १९८५ रोजी नूतन यांचा जन्म झाला. शेतकरी कुटुंबातील त्यांचे आजोबा रघुनाथ भैरू नेवसे यांची नूतनने उच्च शिक्षण घ्यावे आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा शिक्षणाचा वारसा पुढे न्यावा अशी खूप इच्छा होती. त्याचबरोबर आई वडील आणि नामदेव दिनकर जगताप या काकांचे त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन आणि पाठबळ लाभले. बालपणापासूनच अतिशय बुद्धिमान असलेल्या नूतन यांनी अतिशय जिद्दीने अभ्यासावर संपूर्णपणे लक्ष केंद्रित करून नायगाव, इनामगाव, बारामती आणि पुणे विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतले.

सावित्रीबाईंचे जन्मगाव नायगाव हे त्यांचे आजोळ असल्यामुळे सावित्रीबाईंचे व्यक्तिमत्व हे त्यांच्या आकर्षणाचे केंद्र होते‌. त्यामुळे फुले दांपत्यांच्या जीवन घडणीविषयी त्यांना नेहमीच कुतूहल वाटत असे. समाजातील रूढीप्रथा, परंपरा, जातीव्यवस्था, गुलामगिरी या चौकटीबाहेर पडून शिक्षण घेऊन स्वतःच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावणाऱ्या व ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या सावित्रीबाईंच्या व्यक्तिमत्वाविषयी अधिक जाणून घेण्याची तळमळ त्यांच्या मनात होती . त्यासाठी त्यांनी एम.फिलच्या प्रबंधिकेचे लेखन मा.हिंदुराव गोविंद बनसोडे लिखित ‘आभाळाएवढी’ या सावित्रीबाई फुले यांच्यावरील पहिल्या चरित्रात्मक कादंबरीवर केले.
एम. फिल साठी सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या चरित्राचा अभ्यास करत असताना त्यांच्या लक्षात आले की महात्मा फुले यांच्या प्रत्येक कार्यात सावित्रीबाईंचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू समाजासमोर यायला हवेत या उद्देशाने त्यांनी आपल्या सहाध्यायी मित्रमैत्रिणींना सोबत घेऊन सावित्रीबाईंवर अभ्यासपूर्ण लेखन केले . वैविध्यपूर्ण विषय मांडणी असलेले तसेच सामाजिक संदर्भाची झालर असलेले १९ लेख एकत्र करून ‘युगप्रवर्तक सावित्रीबाई फुले’ या पुस्तकाचे संपादन केले. यातून सावित्रीबाईंच्या प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्वावर प्रकाश पडतो.
त्यानंतर त्यांचा नायगाव मधील अशोक बबन नेवसे यांच्याशी विवाह संपन्न झाला. त्यांचे पती अशोक हे महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारे आहेत. त्यामुळे त्यांनी पत्नीला पुस्तक लेखनासाठी तसेच पी.एचडी. ही पदवी मिळवण्यासाठी अभ्यासासाठी मनापासून प्रोत्साहन व प्रेरणा दिली. त्यांनी माझ्यावर कधीच कुठले बंधन न ठेवता माझ्या या शैक्षणिक प्रवासासाठी खंबीर पाठिंबा दिला, त्यामुळेच मला हे यश प्राप्त करता आले अशी कृतज्ञ भावना त्या व्यक्त करतात.
महात्मा फुले हे तेजस्वी व्यक्तिमत्व जाणून घेण्याच्या इच्छे पोटी महात्मा फुले यांच्या चरित्राचा त्यांनी सखोल अभ्यास केला. ‘महात्मा फुले यांच्यावरील चरित्रात्मक कादंबऱ्यांचे सामाजिक व वाङ्मयीन मूल्यमापन’ हा विषय घेऊन त्यांनी पीएचडी पूर्ण केली. आणि २०२० मध्ये ‘मराठी चरित्रात्मक कादंबरीतील महात्मा फुले’ या पुस्तकाचे लेखन केले.
प्रा.डॉ. अविनाश सांगोलेकर, प्रा. डॉ. अविनाश आवलगावकर,प्रा. डॉ. मनोहर जाधव, प्रा. डॉ. विद्यागौरी टिळक, प्रा.डॉ. तुकाराम रोंगटे, प्रा. डॉ. प्रभाकर देसाई, प्रा.डॉ. सिद्धार्थ आगळे,प्रा. डॉ. श्रीराम गडकर, प्रा.डॉ.आनंदा गांगुर्डे या आणि अशा सर्वच मार्गदर्शक मान्यवरांनी त्यांना या संपूर्ण प्रवासात मोलाचे मार्गदर्शन केले. सर्व मित्र-मैत्रिणींनी वेळोवेळी मदत करून प्रोत्साहन दिले. माहेर आणि सासरचे सर्व कुटुंबीय आणि प्रामुख्याने पती अशोक नेवसे यांनी दिलेल्या मोलाच्या पाठबळामुळे आणि नूतन यांच्या जिद्दी, अभ्यासू वृत्तीमुळे ही कठीण गोष्ट त्यांनी साध्य केली. या दरम्यान मोठ्या मुलाचे संगोपन व धाकट्या मुलाचा जन्म अशा दुहेरी पातळीवर त्यांची परीक्षा चालू होती. अतिशय आव्हानात्मक परिस्थितीमध्ये त्यांनी लहान वयात जिद्दीने पीएच.डी. ही पदवी प्राप्त केली, ही अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे.
साहित्यातून समाज दर्शन, मराठी ग्रामीण साहित्य आणि समाज सहसंबंध या संपादित ग्रंथांमध्ये त्यांचे लेख प्रकाशित झाले आहेत. तसेच साहित्य अकादमी आणि मराठी विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित यांनी आयोजित केलेल्या विविध महत्त्वाच्या विषयांवरील राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये त्यांनी उल्लेखनीय सहभाग नोंदवला आहे. राष्ट्रीय सेवा योजना शिबिर, जिल्हास्तरीय निर्भय कन्या अभियान, शैक्षणिक सनद परिषद यातून त्यांनी मौलिक मार्गदर्शन केले आहे. अतिशय बुद्धिमान अशा या सावित्रीच्या लेकीने लहान वयात केलेल्या या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल विविध मानाच्या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.
ज्ञानसंवर्धिनी माध्यमिक विद्यालय, शिरवळ येथे तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंध, पुणे येथे त्यांनी प्रत्येकी एक वर्ष अध्यापन केले आणि आता त्या वाघिरे महाविद्यालय, सासवड येथे असिस्टंट प्रोसेसर म्हणून कार्यरत आहेत.
सावित्रीबाईंचा ज्ञानदानाचा वसा जसा त्यांनी घेतला आहे त्याचबरोबर समाज प्रबोधनाचा वसा देखील अंगीकारला आहे. नायगाव मध्ये विधवा प्रथाबंदीचा ठराव मंजूर झाल्यानंतर डॉ. नूतन यांनी गौरीपूजनाचा मान विधवा महिलांना देऊन या ठरावाची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली.
आज देखील सुशिक्षित स्त्रिया कालबाह्य व्रतवैकल्ये करण्यात बहुमोल वेळ घालवताना दिसतात. त्याऐवजी त्यांनी स्वराज्यजननी जिजाबाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई, ताराराणी, क्रांतीज्योती सावित्रीबाई अशा तेजस्वी महिलांच्या चरित्राचे वाचन करावे आणि त्यांचे युगप्रवर्तक विचार अंगी बाणवावेत असे त्यांना वाटते. याच विचारातून एका पुस्तकाचे लेखन त्या करत आहेत.
शैक्षणिक, साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी आजवर केलेल्या कार्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि या क्षेत्रांमध्ये उत्तुंग भरारी घेण्यासाठी खूप शुभेच्छा.
लेखन – माधुरी शिवाजी विधाटे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button