ताज्या घडामोडीनवरात्री विशेषपिंपरी

भारत सरकारने देशकार्याबद्दल सन्मानित केलेल्या सेवाभावी वैद्यकीय अधिक्षक – डॉ. सरोज मारुती महेशगौरी

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – डॉ. सुशीला नायर यांनी सुरू केलेल्या सेवाग्राम येथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस च्या त्या पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी होत. सेवाग्राम मधील प्रार्थना, सेवाभाव, स्वावलंबन, क्षमाशीलता या गांधीजींच्या विचारांच्या संस्कारांनी त्यांच्या मनात सर्वसामान्यांना वैद्यकीय सेवा देण्याचे बीज पेरले ते डॉ. सरोज मारुती महेशगौरी या होत.

यांच्याबद्दल माहिती अशी की, डॉ. सरोज मारुती महेशगौरी M.B.B.S. M.D. (स्त्रीरोगतज्ञ)
यांचा जन्म चंद्रपूर मध्ये १९५२ साली झाला .सुशिक्षित आई-वडिलांनी तसेच शिक्षणाला समर्पित ज्येष्ठ बंधूंनी अतिशय प्रेमाने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण केली. डॉ. सुशीला नायर यांनी सुरू केलेल्या सेवाग्राम येथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस च्या त्या पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी होत. सेवाग्राम मधील प्रार्थना, सेवाभाव, स्वावलंबन, क्षमाशीलता या गांधीजींच्या विचारांच्या संस्कारांनी त्यांच्या मनात सर्वसामान्यांना वैद्यकीय सेवा देण्याचे बीज पेरले. तसेच प्रत्येक राज्यातून आलेल्या विद्यार्थ्यांमुळे विश्वभारतीची संकल्पना मनात रुजली. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर या विनयशील बुद्धीमतीचा डिस्ट्रिक्ट सुप्रीडेंटंट ऑफ पोलीस या महत्त्वाच्या पदावर कार्यरत असलेल्या मा. मारुती महेशगौरी यांच्याशी विवाह झाला. कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या या महत्त्वपूर्ण क्षेत्राशी त्या जोडल्या गेल्या. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेचा, रुग्णसेवेप्रती समर्पितभावाचा, क्रियाशीलतेचा, उपक्रमशीलतेचा, वक्तृत्वाचा आणि नियोजनबद्ध कार्याचा ठसा उमटवला.

मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये त्यांनी उत्कृष्ट कार्यामुळे नावलौकिक संपादन केला. दहा वर्षे वैद्यकीय अधिकारी आणि नंतर वैद्यकीय अधीक्षक अशी एकूण तीस वर्षे त्यांनी वैद्यकीय सेवा केली. यादरम्यान ग्रामीण व दुर्गम भागात रोगनिदान शिबिरे घेऊन गोरगरीब रुग्णांची सेवा केली. तसेच व्याख्यान, चर्चासत्र, परिसंवाद आणि अभ्यासवर्ग यांच्या माध्यमातून वैद्यकीय ज्ञानाचा प्रसार केला. कॅन्सर डिटेक्शन प्रोग्राम मध्ये दुर्गम भागातील आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या स्त्रियांमध्ये कॅन्सर संदर्भात जागृती केली आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली.

पुणे ससून रुग्णालयाच्या अधीक्षक पदाचा कार्यभार त्यांनी समर्थपणे सांभाळला. तसेच औंध उरो रुग्णालयाच्या अधीक्षक म्हणून महत्वाची जबाबदारी सांभाळली. या रुग्णालयाचे जिल्हा सामान्य रुग्णालयात रूपांतर करण्यासाठी त्यांनी सर्वतोपरी मदत केली. त्यांच्या समर्पित भावातून केलेल्या वैद्यकीय सेवेतून, वैद्यकीय ज्ञान कौशल्यांचा पुरेपूर उपयोग रुग्णाला व्हावा अशीच तळमळ जाणवते‌.
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबई येथील कामा रुग्णालयामध्ये दहशतवाद्यांचा हल्ला झाला त्यावेळी त्या रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक म्हणून रुग्णालयामध्ये प्रत्यक्ष उपस्थित होत्या. या अतिशय कठीण प्रसंगी निर्भयपणे आणि समयसूचकता दाखवून त्यांनी ही कठीण परिस्थिती यशस्वीरित्या सांभाळली. सुरक्षा यंत्रणेला माहिती देऊन कमांडोज मागवले. रुग्णालयाच्या सर्व यंत्रणांमध्ये सुसूत्रता आणून सर्वांचे मनोधैर्य टिकवण्यास मदत केली. आणि मोबाईल आणि मेसेजच्या द्वारे आपल्या सर्व डॉक्टरांना, कर्मचारी वर्गाला आणि रुग्णांना योग्य संदेश देऊन सतर्क केले आणि अनेकांचे प्राण वाचवले. या महत्त्वपूर्ण देश कार्याबद्दल त्यांना ‘प्राइड ऑफ मुंबई’ या सन्मानाने गौरवण्यात आले. भारत सरकार, महाराष्ट्र शासन तसेच विविध संस्थांनी त्यांना याबद्दल सन्मानित केले.

याचप्रमाणे कोविड कालावधीमध्ये जेव्हा रुग्णालये बंद होती त्यावेळेला जवळपास ५००० लोकांना त्यांनी मोफत ऑनलाइन कन्सल्टेशन केले. तसेच दुर्गम भागातील गरोदर स्त्रियांना ऑनलाईन सल्ले देऊन त्यांच्या आरोग्याची उत्तम काळजी घेतली. सेवाभावी वृत्तीने केलेल्या या वैद्यकीय सेवेसाठी त्यांना गौरवण्यात आले आहे.

दोघे पती-पत्नी अतिशय आव्हानात्मक क्षेत्रांमध्ये महत्त्वाच्या पदांवर कार्यरत असल्यामुळे त्यांनी वेळेचे अचूक नियोजन करून सर्व सांसारिक जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या आणि उत्तम सुसंस्कार, उत्तम शिक्षण देऊन मुलांचे सुयोग्य संगोपन केले. त्यांचे पतीराज मा. मारुती महेशगौरी हे अतिशय कर्तबगार आणि धडाडीचे व्यक्तिमत्व असून ३४ वर्षे उत्कृष्ट सेवाकार्य करून पोलीस महानिरीक्षक या अतिशय महत्त्वाच्या पदावरून निवृत्त झाले. मुलगा डॉ. दर्पण हे अस्थिरोग तज्ञ असून ७०० बेडच्या रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. तसेच स्नुषा डॉ. रूपाली या एम. एस. (नेत्ररोग तज्ञ) असून पिंपरी मधील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात नेत्र विभागाच्या प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. दोन्ही मुली गुंजन आणि तरंग या इंजिनियर असून विवाहानंतर परदेशात स्थायिक आहेत. सुविद्य, सुसंस्कृत, सेवाभावी आणि विनयशील स्वभावाचे हे कुटुंब जगताप डेअरी, पिंपळे निलख या परिसरात एक आदर्श कुटुंब म्हणून ओळखले जाते.

सेवानिवृत्तीनंतर सरोज यांनी वाचन, बागकाम, टेबल टेनिस,अध्यापन याचा छंद जोपासत आहेत. परिसरातील घरकाम करणाऱ्या महिलांच्या मुलांच्या शिक्षण व प्रगतीकडे वैयक्तिक लक्ष देऊन, सुसंस्कार घडवत देशाची भावी पिढी घडवण्याचे मोलाचे कार्य त्या करत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरील सुहास्य, प्रसन्न देहबोली, आश्वासक मृदू संभाषण, विषयाचे सखोल ज्ञान, भाषेवरील प्रभुत्व, अमोघ वक्तृत्व, सहजसुंदर संवाद साधण्याची शैली तसेच विनयशील, ऋजु, सेवाभावी, माणुसकी जपणारे व्यक्तिमत्व याचा मनावर अमीट ठसा उमटतो.
गांधीजींच्या राष्ट्रभक्तीचा आणि सेवाभावी विचारांचा वारसा चालवणाऱ्या या अतिशय विचारशील, वैद्यकीय सेवेला समर्पित, व्यासंगी व्यक्तिमत्वाचे खूप खूप अभिनंदन. आणि सर्व कुटुंबीयांच्या छत्रछायेतील आनंदी निरामय दीर्घायुष्याला खूप शुभेच्छा.

लेखन – माधुरी शिवाजी विधाटे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button