तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयाने पटकावला डॉ. विश्वनाथ कराड सांस्कृतिक करंडक
तळेगाव दाभाडे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – एमआयटी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आळंदी यांच्या वतीने आयोजित डॉ. विश्वनाथ कराड सांस्कृतिक करंडकावर इंद्रायणी महाविद्यालयाच्या संघाने आपले नाव कोरले. सुमारे ७० महाविद्यालयांचे सामूहिक संघ यात सहभागी झाले होते. त्या सर्वांमधून इंद्रायणी महाविद्यालयाच्या कृष्णभक्तीवर आधारित असलेल्या समूह नृत्याला परीक्षकांनी प्रथम क्रमांकाने गौरविले.
यावेळी एमआयटी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. मयुरी बापट, उपप्राचार्य डॉ. मानसी अतितकर, एमआयटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. बी. वाफारे, स्पर्धेचे परीक्षक आदी मान्यवर उपस्थित होते.
या सांस्कृतिक स्पर्धेत सुमारे सत्तरपेक्षा जास्त महाविद्यालयांतील स्पर्धकांनी आपली कला सादर केली. शास्त्रीय, पारंपरिक तसेच वेस्टर्न अशा तीन प्रकारांमध्ये ही स्पर्धा पार पडली. इंद्रायणी महाविद्यालयाच्या संघाने कृष्णभक्ती लीला या थीमवर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. कृष्णा मिटकर, प्रा. सत्यजित खांडगे यांनी विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली. डॉ. संदीप कांबळे व प्रा. ज्योति क्षीरसागर यांनी याप्रसंगी सहकार्य केले. इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी विद्यार्थ्यांना विशेष प्रेरणा देत मार्गदर्शन केले.
इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले.