वेध पिंपरी चिंचवड मधील नवदुर्गांचा” साहित्यविश्वातील नवदुर्गा शोभा जोशी
शोभा शरद जोशी
निवृत्त शिक्षिका आणि ज्येष्ठ साहित्यिक
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड मधील शोभा जोशी म्हणजे साहित्यिक विश्वातील चालत बोलत व्यासपीठ होय. आज पासून नवदुर्गाच्या लेखमालेतील पहिले पुष्प.ज्येष्ठ निवृत्त शिक्षिका आणि ज्येष्ठ साहित्यिक आहेत. त्या जुन्या काळातील मॅट्रिक, डीएड असून पुण्यातील भवानी पेठेतील बाल जीवन विकास प्राथमिक शाळेमध्ये ३३ वर्षे अध्यापन करून एक पिढी सुसंस्कारित करण्याचे मोलाचे कार्य त्यांनी केले आहे. शिक्षणाचा ज्ञानदीप हाती घेऊन त्यांनी प्रतिकूलतेचा अंधःकार दूर करून स्वतःबरोबर विद्यार्थ्यांचे जीवन प्रकाशमय केले.
शिक्षण, सुसंस्कार, गीतलेखन व गायन, विद्यार्थ्यांविषयीची आत्मियता, सर्वधर्मसमभाव, जातीभेद निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन या सप्तसूत्रीचा त्यांनी अवलंब केला. यातून आत्मविकास, कुटुंबाचा विकास आणि विद्यार्थ्यांचा विकास घडवून आणला. लहान मुलांना शिकवताना शैक्षणिक संदेश देणाऱ्या स्वलिखित गीतांचे साभिनय गायन करून, विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन, शैक्षणिक सहली काढून, संमेलनातून मुलांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांनी शिक्षण आनंदमय बनवले. चिमणीच्या कवितेतून शून्याची आणि वजाबाकीची संकल्पना स्पष्ट करणे हा त्यांचा अभिनव प्रयोगच म्हणावा लागेल. स्मार्ट पीटी मधून हजारो शिक्षकांना स्वरचित गीतांच्या साभिनय सादरीकरणातून प्रशिक्षित केले. इतर शिक्षकांना शैक्षणिक संसाधने उपलब्ध करून देण्यासाठी आनंददायी शैक्षणिक गीते, आनंददायी लोकगीते व देशभक्तीपर गीते तसेच आनंददायी निसर्ग गीते यांच्या कॅसेट काढल्या आणि यातूनच बालमानसावर उत्तम सुसंस्कार घडवले. तसेच बालचित्रवाणीवर वैविध्यपूर्ण शैक्षणिक कार्यक्रमांच्या निर्मितीत त्यांनी मोलाचा हातभार लावला. तसेच आर्थिकदृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या आणि सांस्कृतिकदृष्ट्या मागासलेल्या भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षणाची गोडी लावून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या या मोलाच्या कार्याबद्दल पुणे शिक्षण मंडळाने आदर्श शिक्षक पुरस्काराने त्यांना सन्मानित केले.
‘डब्यातील लाडू’ या त्यांच्या स्वरचित बालगीतांच्या संग्रहाला ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांची प्रस्तावना लाभली. चिंचवड येथे स्थायिक झाल्यानंतर त्या समरसता साहित्य परिषदेशी जोडल्या गेल्या. पिंपरी चिंचवड मधील विविध साहित्यिक उपक्रमांमध्ये त्यांनी त्यांचा उल्हासपूर्ण सहभाग नोंदवला. समरसता साहित्य परिषदेचे उपाध्यक्षपद आणि त्यानंतर अध्यक्षपद त्यांनी भूषवले. या कालावधीत त्यांनी उत्तमोत्तम साहित्यिक कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन केले. कार्यक्रम वेळेत सुरू करणे, सादरीकरणाच्या वेळेला शांतता राखणे, शिस्तपालन, सर्व कामात अग्रेसर असणे, तनमनधन अर्पून झोकून देऊन काम करणे, स्वतःमधील सुसंस्कार घडवण्यासाठी धडपडणारी शिक्षिका आणि मुलाच्या कल्याणासाठी प्रसंगी कर्तव्यकठोर होणारी प्रेमळ आई जागृत ठेवणे ही त्यांची गुणवैशिष्ट्ये आहेत.
शैक्षणिक तसेच सामाजिक संदेश देणाऱ्या, सुसंस्कार घडवणाऱ्या, देशभक्तीपूर्ण कविता, निसर्ग गीते तसेच स्वरचित लावण्यांचे साभिनय व सुरेल सादरीकरण यामुळे त्यांनी रसिक मनावर अमीट नाममुद्रा उमटवली आहे. पिंपरी चिंचवड परिसरातील विविध साहित्य संस्था तसेच शैक्षणिक संस्था आणि पुनरुत्थान गुरुकुलम या संस्थेशी त्या त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वामुळे जोडल्या गेल्या आहेत. त्यांच्या शैक्षणिक आणि साहित्यिक कार्याबद्दल त्यांना शांता शेळके काव्य पुरस्कार, महाराष्ट्र कामगार साहित्य पुरस्कार, शब्दधन काव्यमंच पुरस्कार, स्वयंसिद्धा राज्यस्तरीय पुरस्कार, गावगाडा पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार, साने गुरुजी पुरस्कार या आणि अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
आपल्या मनमिळाऊ स्वभावाने साहित्यिक व साहित्य रसिकांशी आत्मियतेने प्रेमळ संवाद साधणे, आपुलकीने वागणे, साहित्य विषयक मार्गदर्शन करणे यातून त्या पिंपरी चिंचवड साहित्य वर्तुळात ‘आईसाहेब’ या प्रेमळ उपाधीस उपाधीस पात्र ठरल्या आहेत. त्यांच्याविषयी वाटणाऱ्या या आदरयुक्त प्रेमातून त्यांचा सहस्त्रचंद्र दर्शनाचा सोहळा सर्व कुटुंबीयांनी आणि साहित्यिकांनी अतिशय थाटामाटात साजरा केला. या गुरुतुल्य आणि मातृतुल्य नवदुर्गेच्या
निरामय आणि आनंदमयी शतकपूर्तीसाठी खूप शुभेच्छा.
*लेखन- माधुरी शिवाजी विधाटे
सदस्य- पिंपरी चिंचवड साहित्य मंच
*नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ.