“हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व! – पद्मश्री रमेश पतंगे
पिंपरी (दिनांक : ३० सप्टेंबर २०२४) “हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व, अशी ठाम भूमिका घेऊन पद्मश्री डॉ. प्रभाकर मांडे यांनी सांस्कृतिक कार्य केल्याने त्यांच्या सांस्कृतिक योगदानाचा गौरव करणे हे आपले परम कर्तव्य आहे!” असे प्रतिपादन पद्मश्री रमेश पतंगे यांनी चिंचवडगाव येथे व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (भारतीय लोककला अभ्यास संशोधन व कल्याण केंद्र आणि भाषा व साहित्य प्रशाला) आणि क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोप सत्रात भूमिका व्यक्त करताना पद्मश्री रमेश पतंगे बोलत होते. याप्रसंगी क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, कार्यवाह ॲड. सतिश गोरडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. अविनाश कुंभार, अधिष्ठाता डॉ. प्रभाकर देसाई, प्रांत मंत्री किशोर चव्हाण यांची व्यासपीठावर तसेच मांडे कुटुंबीयांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती.
रमेश पतंगे पुढे म्हणाले की, “डॉ. प्रभाकर मांडे यांचे ग्रंथ विचारांना अन् जीवनाला दिशा देणारे होते, अशी अनुभूती मी स्वतः घेतली आहे. सकल हिंदू समाज हा सर्व गुणदोषांसकट आपला आहे, अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका आहे. डॉ. मांडे यांच्या साहित्यातून गावकुसाबाहेरील समाजाचे दर्शन घडते. त्यांच्या सांस्कृतिक योगदानाचा आढावा घेताना महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची आठवण होते. त्यामुळे लोकसंस्कृतीच्या संशोधकांनी निर्भय होऊन मांडे यांच्यासारखी सरस्वतीसाधना केली पाहिजे!” डॉ. अविनाश कुंभार यांनी अध्यक्षीय मनोगतातून, “डॉ. मांडे यांच्या सांस्कृतिक संशोधनकार्याचा अंतर्भाव नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात व्हायला हवा!” अशी अपेक्षा व्यक्त करून चर्चासत्रासारख्या उपक्रमांना विद्यापीठाचा नेहमीच पाठिंबा राहील, अशी ग्वाही दिली. यावेळी नियोजित प्रभाकर मांडे अध्यासनासाठी सुधीरकुमार अग्रवाल यांनी प्रतिवर्षी ₹११०००/- देणगी देण्याचे जाहीर केले.
गिरीश प्रभुणे यांनी डॉ. प्रभाकर मांडे यांच्या साहित्यलेखन, संशोधन आणि सामाजिक – सांस्कृतिक योगदानाची माहिती आताच्या नवीन पिढीला व्हावी या उद्देशातून आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पूर्ण सहकार्य लाभल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. चर्चासत्राविषयी डॉ. प्रभाकर देसाई, श्रीकांत चौगुले, डॉ. विनायक लष्कर आणि अंजली सुमंत यांनी प्रातिनिधिक मनोगते व्यक्त केली. शाहीर आसराम कसबे यांनी कवन सादर केले. समन्वयक प्रा. डॉ. धनंजय भिसे यांनी समारोप सत्राचे सूत्रसंचालन केले. ॲड. सतिश गोरडे यांनी आभार मानले. संयोजनात डॉ. अशोक नगरकर, रवींद्र नामदे, नितीन बारणे, सुहास पोफळे, पूनम गुजर, अतुल आडे, समर्थ डोंगरे यांनी सहकार्य केले. सामुदायिक पसायदानाने चर्चासत्राचा समारोप करण्यात आला.
त्यापूर्वी, सकाळी संपन्न झालेल्या ‘डॉ. मांडे यांची लोककला व अभिजात रंगभूमीविषयक भूमिका’ या परिसंवादात डॉ. विक्रम कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पूनम देशमुख, अश्विनी ठाकूर, सतीश अवचार, ममता सोनवणे यांनी सहभाग घेतला.
मानसी चिटणीस यांनी सत्राचे सूत्रसंचालन केले. ‘भारतीय संस्कृती आणि डॉ. मांडे यांचे साहित्यलेखन’ या डॉ. अशोक नगरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिसंवादात अनिता साबळे, वैशाली धोंडे, सपना ठाकर, सारिका देसाई यांनी भाष्य केले. सुहास घुमरे यांनी सत्राचे सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. वामनराव गोगटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या ‘भारतीय शिक्षण परंपरा आणि डॉ. मांडे यांचे साहित्यलेखन’ या परिसंवादात गिरीश प्रभुणे, महेश दाबक, डॉ. शामकांत अत्रे, मधुरा डांगे यांनी शिक्षण परंपराविषयक भाष्य केले.
अश्विनी बाविस्कर यांनी सूत्रसंचालन केले. ‘डॉ. मांडे यांचे साहित्यलेखन आणि अस्मिता जागरण’ या डॉ. सुनील भंडगे यांच्या अध्यक्षतेखाली आणि रवींद्र नामदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या परिसंवादात उद्धव काळे, शुभांगी तांबट, डॉ. उज्ज्वला हातागळे, मारुती वाघमारे, कौशल्या गायकवाड, झुंबर मेंगडे सहभागी झाले होते. डॉ. संजय तांबट यांनी सत्राचे सूत्रसंचालन केले.