ताज्या घडामोडीपिंपरी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती समारंभ संपन्न

Spread the love

 

रयत हा एक परिवार – अॅड. भगीरथ शिंदे

औंध, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – ‘रयत हा एक परिवार आहे तसेच रयत शिक्षण संस्थेत काम करणाऱ्या लोकांचे म्हणजेच शिक्षकाचे महत्वाचे योगदान आहे,’ असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे यांनी केले. ते डॉ. बाबाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय औंध येथे आयोजित पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील जयंती समारंभामध्ये बोलत होते. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे सातारा, उपाध्यक्ष अॅड. राम कांडगे यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम संपन्न झाला.

तसेच यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. भगीरथ शिंदे, महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाचे क्षेत्रीय संचालक व सल्लागार सचिन इटकर तसेच व्यासपीठावर महाविद्यालय विकास समितीचे सदस्य, माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, रोटरी क्लब ऑफ औंधचे अध्यक्ष राजेंद्र शेलार उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी अॅड. भगीरथ शिंदे म्हणाले, “मी माझे २५ वर्ष पवार साहेबांसोबत काढले आहे. यामध्ये समतेचा विचार असो वा अण्णांचे विचार हे सर्वात महत्वाचे आहे. रयत हा एक परिवार आहे. रयत संस्थेत कोणत्याही पदाची अपेक्षा न करता प्रामाणिकपणे आपले काम करणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा देखील याप्रसंगी त्यांनी कौतुक केले. तसेच यावेळी बोलताना ते म्हणाले, मी नगर मध्ये असताना पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ३ शाळा स्थापन केल्या.”

याप्रसंगी सचिन इटकर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, “आपल्या शिक्षणाअंतर्गत जगभरात जाऊन जग काबीज करा, रयत शिक्षण संस्थेमधून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी ब्रँड अँबेसिडर व्हायला पाहिजे. तसेच ते म्हणाले, कर्मवीर अण्णांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली, यामुळे वैचारिक शिक्षित लोक तयार झाले आणि त्यांनी भारताचे नेतृत्व केले. याचप्रकारे आपण देखील जग भरात जाऊन जग काबीज करण्याचे स्वप्न पाहणे गरजेचे आहे.”

याप्रसंगी बोलताना अॅड. राम कांडगे म्हणाले, “ज्ञान हे सर्वात पवित्र आहे. ज्ञानाहून अजून काहीही एवढे पवित्र नाही त्यामुळे रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे भाग्य हे पवित्र आहे, अशी ज्ञानाची पवित्र संस्था अण्णांनी स्थापन केली. तसेच मी ज्ञानेश्वरीच्या नगरीतून आलो आहे, आमच्या पिढी न पिढ्या ज्ञानेश्वरीच्या नगरीत काम करतात. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, तुम्ही पुणेकर असल्याचा तुम्हाला अभिमान वाटायला हवा, कारण पुण्याने अण्णांच्या कार्यात खारीचा वाट उचलला आहे. यावेळी कांडगे यांनी अण्णांचे कर्तृत्वाचे प्रसंग सांगत विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात आलेल्या प्रसंगाची त्यांनी कशाप्रकारे लढा दिला, याबाबदल सांगितले. तसेच यावेळी बोलताना, शरद पवार यांचा उल्लेख करत ते म्हणाले, “पवार साहेबांच्या व्यक्तिरेखेवर लिहिण्याची मला संधी मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो.”

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण आंधळे यांनी बोलताना, सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले. तसेच उपास्थित मान्यवरांचे कार्याचे कौतुक केले. यावेळी ते म्हणाले, आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा या कर्मवीर सप्ताह मध्ये मोठा सहभाग असतो, तसेच सर्व विद्यार्थी या सप्ताहात विविध स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभाग घेतात.

या कार्यक्रमात महाविद्यालयातील उपप्राचार्य प्रा. डॉ. प्रभंजन चव्हाण, इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. सविता पाटील, इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. राजेंद्र रासकर, वाणिज्य विभागाचे प्रा. बाळासाहेब कलापुरे, प्रा. कुशल पाखले, प्रा. आसावरी शेवाळे, प्रा. कल्याणी सोनवणे, प्रा. कल्पना कांबळे, प्रा. नेहा भडोळे, प्रा. गणेश पवार तसेच महाविद्यालयातील शिक्षक/ शिक्षिका, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपास्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सायली गोसावी यांनी केले तर प्रास्ताविक प्राचार्य अरुण आंधळे यांनी केले तर आभार प्रा.डॉ. प्रभंजन चव्हाण यांनी मानले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button