चित्रपटातून उलगडणार राष्ट्रपती मुर्मूचा जीवनपट
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भारताच्या प्रथम नागरिक राष्ट्रपती द्रौपदी यांच्या संघर्षशील जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती माऊंटअबू येथील ओम शांती प्रोडक्शनने केली आहे. महामहीम दीदीजी असे या चित्रपटाचे नाव असून, आदिवासी वर्गातून पुढे येऊन देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचण्याचा संघर्षशील प्रवास या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ब्रह्माकुमारीज चे सदस्य व निर्माते आणि चित्रपटाचे लेखक यांनी या चित्रपटाची पहिली प्रत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सुपूर्द केली.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा जन्म ओडिशामधील एका आदिवासी कुटुंबात झाला. घरात अठराविश्व दारिद्रय, शिक्षणाची सोय नाही, अशा अवस्थेत त्यांनी शिक्षण घेतले. त्यानंतर पाटबंधारे खात्यात नोकरी केली. परंतु
लहान मुले असतानाच वैधव्य नशिबी आले. त्यावेळीही त्या प्रतिकूलतेचा सामना करीत पुढे आल्या आणि राजकारणात नगरसेवक, आमदार, राज्यपालपदापासून राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचल्या. महामहीम दीदीजी या चित्रपटातून प्रथमतः खडतर जीवनप्रवास आणि अध्यात्मिक शक्ती व सहनशीलतेच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत सर्वोच्च स्थानापर्यंत कसा प्रवास केला, याचे सचित्र दर्शन घडणार आहे. प्रतिकूल स्थितीत ब्रह्मा कुमारीज शी जोडल्या गेल्या आणि अध्यात्मिक ज्ञानाच्या जोरावर त्या संघर्ष करीत सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकल्या, हेच यातून चित्रपट निर्मात्यांना सांगायचे आहे.
बी. के. प्रभा मिश्रा या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत तर चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन बी. के. पंपोष मिश्रा यांनी केले आहे. अभिनेत्री संपा मंडल, एल. आकांक्षा, नैना रघुवंशी आणि सोनाली पांडे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांची भूमिका साकारली आहे.
गीतकार लातूर जिल्ह्यातील महामहीम दीदीजी चित्रपटातील गीतलेखन भाग्यश्री भास्कर भोजने यांनी बी. के. सुरभी या टोपण नावाने केले आहे . त्या कवयित्री असून, बी. के. सुरभी या टोपण नावाने त्यांची काव्यरचना प्रसिद्ध आहे. त्या मूळ लातूर जिल्ह्यातील हिप्परगा (ता. औसा) येथील कन्या आणि धाराशिव जिल्ह्यातील सिद्धेश्वर वडगावच्या स्नुषा आहेत. ग्रामीण भागात वाढलेल्या एका कवयित्रीने थेट राष्ट्रपतींच्या जीवनावर आधारित चित्रपटात गीतलेखन केले ही सन्मानजनक बाब आहे. त्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.