ताज्या घडामोडीपिंपरी

पुस्तकी ज्ञानासोबतच प्रॅक्टिकल ज्ञान घेण्याला प्राधान्य द्या : हेमंत नाडगौडा

Spread the love
आयआयएमएस तर्फे एमबीए व एमसीए विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन कार्यक्रमाचे आयोजन
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – विद्यार्थ्यांनी सतत माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुस्तकी ज्ञानासोबतच प्रॅक्टिकल ज्ञान घेण्याला प्राधान्य दिले तरच स्पर्धेच्या युगात टिकणार आहात. संधी, आव्हाने आणि प्रगती या तिन्ही गोष्टीचा मेळ घालता आला पाहिजे, असे आवाहन सॅन्डविक कोरेमंट इंडिया प्रा. लि. चे व्यवस्थापक हेमंत नाडगौडा यांनी केले.
             यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट सायन्स (आयआयएमएस) तर्फे एमबीए (MBA) व एमसीए (MCA) विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नाडगौडा बोलत होते. यावेळी आयआयएमएस (IIMS) चे संचालक शिवाजी मुंढे, यशस्वी ग्रुपचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.
           हेमंत नाडगौडा पुढे बोलताना म्हणाले, की विद्यार्थी जीवनात सतत नवीन जाणून घेण्याची उत्सुकता हवी. दररोज नवीन लोकांना भेटून त्यांचे विचार आत्मसात करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. जेणेकरून एमबीए (MBA) व एमसीए (MCA) पदवी घेऊन बाहेर पडल्यानंतर समाजावर आपला प्रभाव पडला पाहिजे. नवनवीन कल्पना मांडा, कठीण काळात उभे राहण्याची क्षमता बाळगा, तसेच आरोग्याची काळजी घ्या. आनंद मिळवत पदवी पूर्ण केल्यास मनावर ताण येणार नाही. महत्त्वाचे म्हणजे इतरांचे मन दुखावणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
          प्रास्ताविक करताना डॉ. शिवाजी मुंढे, संचालक यांनी विद्यार्थ्यांना आय. आय. एम. एस. संस्था व यशस्वी ग्रुपची माहिती दिली. विद्यार्थ्यांना त्यांची ध्येय व स्वप्ने पूर्ण करण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले.
          यशस्वी ग्रुपचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी म्हणाले, की एमबीए व एमसीए पदवी दरम्यान शिस्त, दृढनिश्चय केला पाहिजे. यशस्वी लोकांचे अनुकरण करा, असफल लोकांच्या गोष्टी वाचा, मनावर ताण न घेता आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न केल्यास करिअरमध्ये नक्कीच यशस्वी व्हाल. उद्योजकता आणि नेतृत्व कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.
          दरम्यान, सायबर सिक्युरिटी कॉर्पोरेशनचे सीईओ डॉ. हॅरॉल्ड डी’कॉस्टा, समीर कुलकर्णी, डॉ. सी. एम. चितळे, मनोजकुमार चौधरी, डॉ. शाद अहमद खान यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत प्रोत्साहित केले.
        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेत्रा ठाकूर आणि स्नेहा सुभीया यांनी केले, तर आभार एमबीए विभागप्रमुख डॉ. वंदना मोहंती यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button