पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभाग क्र. १३ मधील दुर्गानगर चौक ते निगडी बस स्टॉप दरम्यान ‘अर्बन स्ट्रीट’ प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या फुटपाथवरील बेंचेस हटविण्याची मागणी करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला आक्रमक इशारा दिला आहे. या संदर्भात महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना निवेदन देण्यात आले असून, सात दिवसांत कार्यवाही न झाल्यास मनसेकडून स्वखर्चाने जेसीबी लावून बेंचेस हटविण्यात येतील, असा इशारा देण्यात आला आहे.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दुर्गानगर चौक ते निगडी बस स्टॉप या रस्त्याच्या डाव्या बाजूस बसविण्यात आलेल्या बेंचेसमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना फुटपाथवरून चालताना अडथळा निर्माण होत असून, पादचाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेला फुटपाथच असुरक्षित बनला आहे.
तसेच रात्रीच्या वेळी या बेंचेस परिसरात गैरप्रकार वाढत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. अंधाराचा फायदा घेऊन काही तरुण-तरुणींकडून आक्षेपार्ह वर्तन केले जात असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. याशिवाय परिसरात दारूच्या रिकाम्या बाटल्या, सिगारेट पाकिटे, कंडोम पाकिटे यांसारख्या वस्तू मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर हा विषय अत्यंत गंभीर असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे सार्वजनिक सुरक्षेचा विचार करून संबंधित सर्व बेंचेस तात्काळ हटवावेत, परिसरात पुरेशी स्ट्रीट लाईट व्यवस्था करावी आणि रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
महापालिका प्रशासनाने सात दिवसांत ठोस निर्णय न घेतल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलनात्मक भूमिका घेत स्वखर्चाने जेसीबीच्या साहाय्याने बेंचेस हटवेल, असा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

