पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या संतापजनक घटनेचे तीव्र पडसाद पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले.
राज्यभरातून या घटनेचा निषेध होत असताना, महापालिकेच्या सभागृहातही सर्व पक्षीय सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
सभेच्या सुरुवातीला पिडीत मुलीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर आरोपीला तात्काळ कठोरात कठोर शिक्षा देण्याची एकमुखी मागणी करत सभा दुपारी तीन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली. तहकूबीनंतर सभा पुन्हा सुरू होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर रवि लांडगे तर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी उपस्थित होते.
विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी या घटनेवर भावना व्यक्त करताना, “मी स्वतः मुलीचा बाप असल्याने या घटनेची वेदना अधिक तीव्रतेने जाणवते. शहरात वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांसोबत तातडीने बैठक घेण्यात यावी. महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष हेल्पलाईन किंवा स्वतंत्र टास्क फोर्स स्थापन करावी,” अशी मागणी केली. तसेच पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत अधिक कडक नियंत्रणाची गरज त्यांनी व्यक्त केली.
स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत कायदा विभागाने तत्परता दाखवावी, असे सांगितले. तसेच पोलीस आयुक्तांसोबत तातडीची बैठक घेऊन ठोस उपाययोजना आखाव्यात आणि त्याचा अहवाल पुढील सभेत सादर करावा, अशी मागणी त्यांनी केली.
पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी समाजातील वाढत्या विकृतीवर भाष्य करत, “फक्त भौतिक सुविधा नव्हे तर संस्कारांचीही गरज आहे. पोलीस यंत्रणा प्रभावीपणे काम करत नसल्याने नागरिकांमध्ये भीती कमी झाली असून गुन्हेगारीला चालना मिळत आहे,” असे मत व्यक्त केले. त्यांनीही पोलीस आयुक्तांसोबत तातडीने बैठक घेण्याची मागणी केली.
यावेळी नगरसेवक आणि नगरसेविकांनीही या घटनेबद्दल तीव्र भावना व्यक्त करत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली. नगरसेवक उत्तम केंदळे यांनी सभा तहकुबीस अनुमोदन देत महापौरांकडे तहकुबीची विनंती केली.
दरम्यान, महापौर रवि लांडगे यांनी दोन दिवसांत पोलीस आयुक्तांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्यांनी सभा दुपारी तीन वाजेपर्यंत तहकूब करण्याची घोषणा केली. या घटनेमुळे संपूर्ण सभागृहात शोककळा पसरली असून, महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे.

