प्रेरणादायी कार्यकर्त्यांचा दिमाखदार सन्मान सोहळा संपन्न
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शून्यातून विश्व उभं करणाऱ्या उद्योजकांचा सन्मान म्हणजे केवळ एका व्यक्तीचा गौरव नसून कष्ट, जिद्द आणि समाजाला काहीतरी देण्याच्या भावनेचा सन्मान असतो. उद्योजक भरत गीते यांच्या कार्याचा गौरव म्हणजे त्यांच्या जिद्द, सचोटी आणि समाजाभिमुख कार्याची पावतीच आहे. त्यांचा प्रवास नव उद्योजकांना कायम प्रेरणा देत राहील, असे मत खासदार Shrirang Barne यांनी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात रविवारी (दि. 6) आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले. रमा मंगल सोशल फाऊंडेशनच्या कार्याचेही त्यांनी विशेष कौतुक केले.
समाजाचे काहीतरी देणे लागते या भावनेतून पिंपरी-चिंचवड तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यात विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची दखल घेत रमा मंगल सोशल फाऊंडेशनच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात पार पडला. या कार्यक्रमात खासदार बारणे बोलत होते. या वेळी व्यासपीठावर महापौर रवी लांडगे, मराठी अभिनेते Makarand Anaspure, उद्योजक भरत गीते, नगरसेविका सुलभा उबाळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कविता आल्हाट, नगरसेवक अनंत को-हाळे, उद्योजक अमेय जैन, महावितरणचे कार्यकारी संचालक धनंजय औंढेकर, शिवसेना जिल्हा संघटक तथा रमा मंगल सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष सौंदणकर, मनीषा थोरात तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
महापौर रवी लांडगे म्हणाले, “कला आणि संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी वाचन संस्कृती रुजवणे ही काळाची गरज आहे. यासाठी महापालिकेच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना विविध क्षेत्रातील नामवंत लेखकांची पुस्तके उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याच अनुषंगाने पिंपरी-चिंचवड शहरात सुसज्ज आणि आधुनिक ग्रंथालय उभारण्याचा मानस आहे. या उपक्रमामुळे वाचनाची गोडी वाढेलच, शिवाय कला आणि संस्कृतीचे जतनही प्रभावीपणे होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रस्काराचे मानकरी :
भरत गीते (उद्योगभूषण), वैभव थोरात (शिक्षण महर्षी), सुनील काकडे (कार्यगौरव), नितीन सूर्यवंशी (उत्कृष्ट कार्य), रवींद्र ठिकेकर (यशस्वी उद्योजक), संदीप बेलसरे (उद्योग नवोन्मेष), दीपक माने (सामाजिक कार्यगौरव), जयश्री सुरवसे (द्रोणाचार्य पुरस्कार), ज्योत्स्ना मावळे (मानसशक्ती पुरस्कार), नवनाथ ढवळे (शिक्षणरत्न), वंदना चव्हाण (नारीशक्ती कार्यगौरव), मराठवाडा युवा मंच (सामाजिक कार्यगौरव), समर्थ महिला बहुउद्देशीय संस्था (महिला सशक्तीकरण कार्यगौरव), नीता पाडाळे (आदर्श नगरसेविका), प्रीती बोंडे (आदर्श व्यक्तिमत्व), विठ्ठल हॉस्पिटल, मोशी (महाराष्ट्र धन्वंतरी गौरव), केसर ग्रुप (उत्कृष्ट बांधकाम व्यवसायिक), विश्वकल्याण इंग्लिश मीडियम स्कूल (ज्ञानदीप गौरव पुरस्कार), जाणीव परिवार (मोशी) (सामाजिक कार्यगौरव), आपला परिवार सोशल फाऊंडेशन (पर्यावरण संवर्धन कार्यगौरव), शिव योद्धा ग्रुप (महाराष्ट्र शिवविचार गौरव).
दरम्यान, मराठी चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी उद्योजक भरत गीते यांची प्रकट मुलाखत घेत कार्यक्रमात रंगत आणली. यावेळी गीते यांनी बदलत्या उद्योग क्षेत्रातील संधी, आव्हाने तसेच ‘मेड इन इंडिया’ उत्पादनांचे वाढते महत्त्व यावर सखोल प्रकाश टाकला. आयआयटीप्रमाणेच आयटीआय संस्थांचे अस्तित्व टिकवणेही तितकेच आवश्यक असल्याचा महत्त्वपूर्ण मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

