पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अमेरिका, इस्राइल आणि इराणच्या पार्श्वभूमीवर औद्योगिक गॅस सिलेंडरचा तुटवडा असल्यामुळे कामगारांवर मोठे संकट कोसळले असून त्यांच्या जेवणाचे हाल होत आहेत म्हणून कम्युनिटी किचन सुविधा व शिव भोजन थाळी केंद्रांची संख्या वाढवण्याची मागणी कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे आज करण्यात आली.
कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे मुख्यमंत्री, अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांना निवेदन पिंपरी चिंचवडचे अप्पर तहसीलदार जयराज देशमुख यांच्याकडे देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यातील आणि पुण्यातील कष्टकरी, कामगारांवर कोरोना सारखी परिस्थिती उडवलेले असून त्यांचे हातचे काम गेले आहे अशा कामगारांना परत जाण्यासाठी आणि पुन्हा येण्यासाठी ते खर्च करू शकत नाहीत कारण पगार मिळत नाही, ठेकेदार आणि कंपनी व्यवस्थापन सहकार्य करीत नाही अशी बिकट परिस्थिती आहेत. म्हणून ठराविक कालावधीसाठी कम्युनिटी किचन म्हणजे सामूहिक भोजन व्यवस्था सुरू करण्यासाठी उपाय योजना करण्यात याव्यात. आपले कार्यालयाकडून तात्पुरती जागा व सिलेंडरची उपलब्धता करून दिल्यास महासंघाकडून मोफत जेवण देण्याची व्यवस्था करणे शक्य होईल. शिवभोजन थाळीची संख्या वाढवून आणि केंद्र वाढवून शहरांमध्ये १० ठिकाणी थाळी सुरू करण्यात यावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या.
यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, मनपा सदस्य राजू बिराजदार, कार्याध्यक्ष इरफान चौधरी, सहदेव होणमने, मनोज यादव, मनोज रूपनर, नामदेव राजपुरे, अंबालाल सुखावाल, सचिन कांबळे, रज्जाक शेख आदी उपस्थित होते.

