पिंपरी-चिंचवडमध्ये भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवा निमित्त २५ ते ३१ मार्चदरम्यान ४०हून अधिक कार्यक्रमांचे आयोजन, महासंघाचे अध्यक्ष श्रेयस पगारिया व संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया यांची माहिती
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या वतीने भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त यंदा विविध धार्मिक, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांची भव्य मालिकाच आयोजित करण्यात आली आहे. २५ मार्च ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत ‘अहिंसा सप्ताह’, अहिंसा रॅली, अहिंसा पुरस्कार, आरोग्य शिबिरे, सांस्कृतिक कार्यक्रम अशा सुमारे ४०हून अधिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सवाची सुरुवात २५ मार्च रोजी कासारवाडी येथील प्यारीबाई पगारिया सभागृहात भक्तामर पठणाने होणार असून त्यानंतर पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषद सभागृहात विश्वशांती परिषद आयोजित करण्यात आली आहे.
२६ मार्च रोजी पाणपोई उद्घाटन, गौतम प्रसादी भवन उद्घाटन व अन्नधान्य वाटप असे उपक्रम पार पडणार आहेत. २७ मार्च रोजी सावित्रीबाई फुले उद्यान, पिंपळे निलख येथे वृक्षारोपणातून तीर्थंकर वाटिकेचा शुभारंभ केला जाणार असून प्रश्नमंजुषा व सन्मान समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
२८ मार्च रोजी आनंद चालीसा, ‘आनंद की रोटी’ उपक्रम, चित्रकला स्पर्धा व पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. २९ मार्च रोजी रक्तदान, नेत्र तपासणी, आयुर्वेदिक शिबिरे, भक्ती गीत स्पर्धा, तसेच विविध आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
३० मार्च रोजी निगडी येथील भगवान महावीर दिगंबर जैन मंदिरात नेत्रदान फॉर्म नोंदणी, रक्तदान व कर्करोग तपासणी शिबिर होणार आहे.
महोत्सवाचा मुख्य आकर्षण असलेली अहिंसा रॅली ३१ मार्च रोजी दुपारी ३ वाजता नवी सांगवी येथील संस्कृती लॉन्स येथून निघणार असून शहरातील विविध मार्गांवरून फिरत पार्श्वनाथ चौक, बिजलीनगर येथे पोहोचेल. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता अहिंसा पदयात्रा काढण्यात येणार आहे. या पदयात्रेचा समारोप ग.दि. माडगूळकर सभागृह, निगडी येथे होईल.
याच सभागृहात सायंकाळी ६ वाजता भक्ती संध्या कार्यक्रम तसेच अहिंसा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार असून प्रसिद्ध गायक मेहुलभाई रुपडा यांची भक्ती गीत संध्या सादर होणार आहे.
या महोत्सवात विविध सामाजिक उपक्रमांद्वारे रक्तदान, नेत्रदान, अन्नदान, आरोग्य तपासणी आणि पर्यावरण संवर्धनावर विशेष भर देण्यात आला आहे.
या सर्व कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भगवान महावीरांच्या अहिंसा, करुणा आणि मानवतेच्या संदेशाचा प्रसार करावा, असे आवाहन महासंघाचे अध्यक्ष श्रेयस पगारिया व पदाधिकाऱ्यांनी केले आहे. यावेळी सर्व कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावून हा जन्मकल्याणक महोत्सव आनंदी वातावरणात संपन्न करावा असे आवाहन महासंघाचे अध्यक्ष श्रेयस पगारिया,कार्याध्यक्ष विजय भिलवडे, स्वागताध्यक्ष किरणभाई शहा, कोषाध्यक्ष नेनसुख मांडोत, महामंत्री संदीप फुलफगर, वरिष्ठ उपाध्यक्ष दिलीप भन्साळी, प्रकाश गादिया, उपाध्यक्ष शांतीनाथ पाटील, श्रेणिक मंडलेचा मंत्री वीरेश छाजेड, सुरगोंडा पाटील, सहकोषाध्यक्ष तुषार मुथा, प्रसिद्धी प्रमुख संदेश गदिया, धीरज नहार तसेच संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया, माजी अध्यक्ष अजित पाटील, नितीन बेदमुथा,विलासकुमार पगारिया, प्रा. प्रकाश कटारिया, वीरेंद्र जैन, उमेश पाटील या सर्वांनी केले आहे.

