पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौर, उपमहापौरांची (शुक्रवारी) निवड होणार आहे. त्यामुळे उद्यापासून लोकप्रतिनिधींचा म्हणजे नगरसेवकांचा कारभार सुरू होणार आहे. तीन वर्षे १० महिने २४ दिवसांपासूनची प्रशासकीय राजवट संपणार आहे. तब्बल चार वर्षांनी महापालिका सभागृह, पदाधिकाऱ्यांची दालने गजबजणार आहेत.
महापालिकेत फेब्रुवारी २०१७ मध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांची पाच वर्षांची मुदत १३ मार्च २०२२ रोजी संपली होती. मात्र, करोना, इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) आरक्षण, न्यायप्रविष्ठ मुद्दा आणि राज्यातील बदललेली राजकीय समीकरणे अशा विविध कारणांमुळे निवडणूक लांबली होती. तेव्हापासून महापालिकेवर प्रशासकीय राजवट होती. चार वर्षे प्रशासकच संपूर्ण कारभार पाहत होते. तत्कालीन आयुक्त राजेश पाटील, शेखर सिंह, श्रावण हर्डीकर या तीन आयुक्तांनी प्रशासक म्हणून कामकाज पाहिले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, जानेवारीत महापालिका निवडणूक पार पडली. १६ जानेवारी रोजी मतमोजणी झाली. त्यात भाजपने ८४ जागा जिंकून दुसऱ्यांदा महापालिकेतील सत्ता काबीज केली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ३७, शिवसेनेचे (शिंदे) सहा आणि एक अपक्ष उमेदवार निवडून आला आहे.
चार वर्षांनी गजबजणार सभागृह
महापौर, उपमहापौरांच्या विशेष सभेसाठी चार वर्षांनी महापालिका मुख्यालयातील पहिल्या मजल्यावरील यशवंतराव चव्हाण सभागृहाचे दार उघडले जाणार आहे. या सभेत रवी लांडगे यांच्या बिनविरोध महापौर निवडीवर शिक्कामोर्तब केले जाईल. उपमहापौरपदासाठी भाजपच्या शर्मिला बाबर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या वैशाली काळभोर या दोघींचे अर्ज आहेत. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया होणार की राष्ट्रवादी काँग्रेस माघार घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दालने सज्ज
महापालिका भवनातील तिसऱ्या मजल्यावर स्थायी समिती सभागृहासह महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, गटनेते, स्थायी समिती, विधी, क्रीडा, शहर सुधारणा, महिला व बालकल्याण समित्यांची दालने आहेत. जैवविविधता, शिक्षण समित्यांची दालने दुसऱ्या मजल्यावर आहेत. या दालनातील देखभाल-दुरुस्तीची कामे पूर्ण झाली आहेत. महापौरांचे दालन सज्ज करण्यात आले आहे. उपमहापौरांचे दालन सभागृह नेत्यासाठी दिले जाणार असून, या दालनाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे.
नगरसेवकांचा कालावधी शुक्रवारपासून
महापालिकेचा निकाल १६ जानेवारीला जाहीर झाला असला, तरी महापौरांची निवड आज झाली आहे. त्यामुळे नगरसेवकांचा पाच वर्षांचा कालावधी शुक्रवारपासून सुरू होणार आहे. ५ फेब्रुवारी २०३१ पर्यंत नगरसेवकांचा कालावधी असणार आहे.

