पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे सौदागर येथे विकसित करण्यात आलेले बाळासाहेब कुंजीर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल आता केवळ एक मैदान न राहता भावी खेळाडू घडविणारे प्रभावी केंद्र म्हणून ओळख निर्माण करत आहे. सुमारे एक लाख चौरस फूट क्षेत्रफळात उभे राहिलेले हे क्रीडा संकुल ठोस राजकीय इच्छाशक्तीचे जिवंत उदाहरण ठरत असून, विकास म्हणजे फक्त इमारती उभारणे नव्हे तर येणाऱ्या पिढीचे भविष्य घडवणे हा विचार येथे प्रत्यक्षात उतरलेला दिसतो.
या क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल मैदान, चालणे-धावण्यासाठी सुसज्ज ट्रॅक, बास्केटबॉल कोर्ट तसेच आधुनिक क्रिकेट पिच उभारण्यात आले आहे. या सर्व सुविधांमागे केवळ खेळाला चालना देण्याचा उद्देश नसून, निरोगी, सक्षम आणि आत्मविश्वासपूर्ण समाजनिर्मितीची दूरदृष्टी असल्याचे स्पष्ट होते.
मैदानाभोवती असलेल्या वॉकिंग-जॉगिंग ट्रॅकमुळे पिंपळे सौदागर परिसरातील सकाळ-संध्याकाळचे वातावरण चैतन्यमय झाले आहे. ज्येष्ठ नागरिक नियमितपणे आरोग्यासाठी चालताना दिसतात, तर युवक-युवती उत्साहाने धावण्याचा सराव करताना दिसत आहेत. बास्केटबॉल कोर्टवर लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिक खेळाचा आनंद घेत आहेत.
या क्रीडा संकुलाची विशेष बाब म्हणजे येथे क्रिकेट पिच केवळ पुरुषांसाठी मर्यादित न राहता महिलांसाठीही खुले करण्यात आले आहे. पिंपळे सौदागरच नव्हे तर संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरातील तब्बल १६७ महिला क्रिकेटपटू येथे नियमित सराव करत आहेत. त्यामुळे महिलांच्या क्रीडा क्षेत्रातील सहभागाला नवी दिशा आणि गती मिळत आहे.
“येथील प्रत्येक मुला-मुलीच्या डोळ्यांत ऑलिम्पिकचे स्वप्न दिसावे” हा विचार बाळासाहेब कुंजीर फुटबॉल मैदानाच्या माध्यमातून प्रत्यक्षात साकार होताना दिसत आहे. त्यामुळे हे मैदान आज पिंपळे सौदागरपुरतेच नव्हे तर संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरासाठी अभिमानाचे केंद्र बनले आहे.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रभाग क्रमांक २८ (पिंपळे सौदागर–रहाटणी परिसर) मध्ये भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, भाजपचे अधिकृत उमेदवार शत्रुघ्न काटे, अनिता काटे, संदेश काटे आणि कुंदा भिसे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र आहे. विकासकामांच्या मुद्द्यावर मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
“पिंपळे सौदागर-रहाटणी परिसराचा विकास म्हणजे केवळ रस्ते, इमारती किंवा सुविधा उभारणे नव्हे, तर येथील मुलांना दर्जेदार संधी उपलब्ध करून देणे हा आमचा खरा उद्देश आहे. क्रीडा, आरोग्य, शिक्षण आणि मूलभूत सुविधांमध्ये सातत्याने गुंतवणूक करून हा प्रभाग पिंपरी-चिंचवडमधील आदर्श प्रभाग म्हणून विकसित करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे मत भाजप उमेदवार शत्रुघ्न काटे यांनी व्यक्त केले.

