पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून काळेवाडी परिसरातील महिलांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून थेट महिलांच्या खात्यावर आर्थिक मदत जमा करण्यात आली आहे. भाजपचे अधिकृत उमेदवार विनोद नढे यांच्या पुढाकारातून ही योजना प्रत्यक्षात उतरली असून, त्यांच्या अधिपत्याखाली सौ. प्रियंका नढे यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी पुढाकार घेतला आहे.
काळेवाडी परिसरातील सुमारे १२ हजार महिलांना थेट आर्थिक मदत देण्यात आली असून, ही मदत भाजपच्या महिला-केंद्रित धोरणाचा भाग असल्याचे सांगण्यात आले. महिलांना केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष लाभ देण्यावर भर देण्यात आला आहे. “महिला सक्षम झाल्या तर कुटुंब सक्षम होते आणि कुटुंब सक्षम झाले तर समाज सक्षम होतो,” या भूमिकेतून हा उपक्रम राबविण्यात आल्याचे भाजप नेत्यांनी स्पष्ट केले.
या उपक्रमामुळे काळेवाडीतील महिलांमध्ये समाधानाचे वातावरण असून अनेक महिलांनी भाजपच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले आहे. यावेळी महिलांनी ‘आमदार शंकरराव जगताप यांच्या नेतृत्वावर विश्वास असून विकासासाठी भाजपच योग्य पर्याय आहे,’ अशी भावना व्यक्त केली.
दरम्यान, काळेवाडीच्या विकासासाठी ७०० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आल्याचा उल्लेख यावेळी करण्यात आला. आमदार शंकरराव जगताप यांच्या माध्यमातून परिसरात रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, आरोग्य व शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कामे सुरू असून विकासाचा वेग वाढल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे, लवकरच “लखपती बहीण योजना” सर्व महिलांसाठी प्रभावीपणे राबवली जाणार असल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले. या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचा भाजपचा संकल्प असल्याचे सांगण्यात आले.
एकूणच, कोळवाडी परिसरात भाजपकडून महिलांसाठी राबविण्यात येत असलेले उपक्रम, थेट आर्थिक मदत आणि मोठ्या विकासनिधीची घोषणा यामुळे स्थानिक राजकारणात भाजपची पकड अधिक मजबूत होत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

