ताज्या घडामोडीपिंपरी

स्पर्धेतून मिळते विद्यार्थ्यांच्या विचारांना प्रेरणा – डॉ. आदित्य अभ्यंकर

Spread the love
पीसीसीसोईआर येथे ‘अल्टिमेट रोबोटिक चॅम्पियनशिप – २४’ चे उद्घाटन
पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – विविध स्पर्धांमधून भाग घेताना विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण विचारांना प्रेरणा मिळते. चाकोरी बाहेरच्या नवकल्पना अशा स्पर्धांमधून प्रकट होतात. त्यासाठी रोबोटिक चॅम्पियनशिप सारख्या राष्ट्रीय स्पर्धा एक उपयुक्त व्यासपीठ आहे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. आदित्य अभ्यंकर यांनी व्यक्त केले.
     पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च (पीसीसीसोईआर) येथे अल्टिमेट रोबोटिक चॅम्पियनशिपचे (युआरसी) आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन बुधवारी (दि. १६) करण्यात आले. यावेळी पीसीसीसोईआर चे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, ई अँड टीसी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. राहुल मापारी, प्रा. दिपाली ढाके, प्रा. रूपाली तावडे आदी उपस्थित होते.
    या दोन दिवसीय राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातील विविध शैक्षणिक संस्थांच्या २२ संघांनी सहभाग घेतला आहे. विद्यार्थ्यांना रोबोटिक क्षेत्रातील माहिती व्हावी, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा याबद्दल जाणून घेता यावे यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे, असे डॉ. राहुल मापारी यांनी सांगितले.
    येत्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर वाढणार आहे. विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यासक्रमा बरोबरच तंत्रज्ञानातील बदल आत्मसात करण्यावर भर दिला पाहिजे, असे डॉ. हरीश तिवारी म्हणाले.
    कार्यक्रमास महाविद्यालयातील विविध विद्याशाखांचे प्रमुख, देशभरातून आलेले विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते. सुत्रसंचलन सुहानी चालमेटी हिने केले. प्रा. रूपाली तावडे यांनी आभार मानले.
   पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयू चे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
चौकट –
शिक्षणावर ब्रिटिशांचा पगडा – डॉ. आदित्य अभ्यंकर
भारतावर ब्रिटिशांनी अनेक वर्ष राज्य केले. त्याचा परिणाम शैक्षणिक क्षेत्रातही दिसून येतो. या शिक्षण पध्दतीत केवळ कारकुन तयार होण्याचे काम होते. रट्टा मारून शिक्षणाची प्रगती होत नाही. मुलांना लहानपणापासून अनेक छोटे छोटे प्रश्न सतावत असतात. परंतु या शिक्षण पद्धतीमुळे त्यांना पडलेले प्रश्न सोडविण्यासाठी बळ मिळत नाही. विचार, संशोधन वृत्तीला खतपाणी घातले पाहिजे. हळूहळू ही परिस्थिती बदलत आहे‌. विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती जोपासली जात आहे. त्यासाठी सरकार व अनेक शैक्षणिक संस्था प्रयत्न करत आहे; ही समाधानाची बाब आहे. आयटी क्षेत्रात प्रॉडक्टिव्ह कंपनी भारतामध्ये नाही ती भविष्यात उभी राहिली पाहिजे, अशी अपेक्षा डॉ. आदित्य अभ्यंकर यांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button