ताज्या घडामोडीपिंपरी

संत निरंकारी मिशनद्वारा आयोजित भोसरी येथे रक्तदान शिबिरामध्ये ५९३ रक्तदात्यांचा सहभाग

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –     सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने पुणे झोन मधील भोसरी ब्रांच अंतर्गत संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनद्वारा विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन संत निरंकारी सत्संग भवन, दिघी रोड, भोसरी येथे २४ डिसेंबर २०२३ रोजी करण्यात आले होते. ज्यामध्ये ५९३ निरंकारी भक्तांनी निस्वार्थ भावनेने रक्तदान केले, निरंकारी भक्तांबरोबर समाजातील अनेक सज्जनांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेतला. वाय.सी.एम. रुग्णालय रक्तपेढी यांनी २७४ युनिट, औंध रुग्णालय रक्तपेढी यांनी १११ युनिट, संत निरंकारी रक्तपेढी यांनी २०८ युनिट रक्त संकलन करण्याचे कार्य केले.

शिबिराचे उद्घाटन  चंद्रकांत इंदलकर (सहआयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका),  सुनील पांढरे (सहआयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाला  महेश  लांडगे (आमदार),  विलास लांडे (मा.आमदार) तसेच भोसरी परिसरातील अनेक नगरसेवक यांनी सदिच्छाभेट देऊन मिशनच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.

चंद्रकांत इंदलकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि पिंपरी-चिंचवड मध्ये एकूण रक्तसाठ्याच्या ३० टक्के रक्त हे संत निरंकारी मिशनच्या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून उपलब्ध होत असते, तसेच कोरोना काळामध्ये मिशनच्या माध्यमातून केलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.

संत निरंकारी मिशनद्वारे पहिल्या रक्तदान शिबिराचे आयोजन दिल्ली येथे नोव्हेंबर १९८६ मध्ये संत निरंकारी समागमामध्ये करण्यात आले होते. बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी मानवतेला संदेश दिला कि ‘रक्त नाल्यांमध्ये नाही, नाड्यांमध्ये वाहिले पाहिजे’. संत निरंकारी मिशनच्या अनुयायांनी हा संदेश निश्चितपणे चरितार्थ केला असून आज वर्तमान काळात सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या निर्देशानुसार निरंतर पुढे नेला जात आहे.

गेल्या १५ दिवसांपासून समाजामध्ये रक्तदानाविषयी जागृती निर्माण व्हावी यासाठी मिशनच्या सेवादारांनी भोसरी परिसरामध्ये रॅलीच्या माध्यमातून तसेच घराघरामध्ये जाऊन जनजागृती केली. रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी संत निरंकारी सेवादल, मिशनचे अनुयायी यांचे योगदान लाभले. आलेल्या सर्व रक्तदात्यांचे आणि मान्यवरांचे आभार भोसरी सेक्टर प्रमुख अंगद जाधव यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button