श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयात विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवडच्या विकास शिक्षण मंडळ संचलित श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयात थोर गणितज्ञ प्राध्यापक रामानुजन यांच्या जन्मदिवशी भव्यदिव्य गणित आणि विज्ञान प्रदर्शनाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते.
आजचा विद्यार्थी हा भविष्यातील जबाबदार नागरिक असतो. लहानपणीच त्याच्यामध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळाला, तर तो भविष्यात यशस्वी गणितज्ञ अथवा यशस्वी वैज्ञानिक बनू शकतो. अशा होतकरू विद्यार्थ्यांना त्यांच्या या ध्येयापर्यंत नेण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या चिंचवडच्या विकास शिक्षण मंडळ संचलित श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयात गणितज्ञ प्राध्यापक रामानुजन सर यांच्या जन्मदिवशी शुक्रवार दिनांक २२ डिसेंबर २०२३ रोजी सर्व विद्यार्थ्यांसाठी गणित आणि विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यास एस. पी. जी. इंटरनॅशनल स्कूल तथा जय हिंद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक आणि एमडी लोणारी सोशल ग्रुपचे अध्यक्ष श्री नितीन लोणारी साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्येची आराध्य दैवता असलेल्या माता सरस्वतीच्या तथा प्राध्यापक रामानुजन सरांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष श्री जगदीश जाधव सर यांच्या शुभहस्ते प्रमुख पाहुण्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या मनामध्ये गणित आणि विज्ञान विषयांची गोडी निर्माण व्हावी आणि या विषयांशी जवळीक निर्माण व्हावी, याकरिता अशा प्रकारच्या प्रदर्शनांना अनन्यसाधारण महत्त्व असते. सुरुवातीला या प्रदर्शनाचे महत्त्व आणि माहिती विद्यार्थ्यांना सांगण्यात आली. याशिवाय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रगतीसाठी संस्था राबवत असलेल्या सर्व उपक्रमांविषयी आणि विद्यालयातील शैक्षणिक तथा भौतिक सुविधांविषयी सविस्तर माहिती सांगण्यात आली. विद्यालयात गणित, इंग्रजी, विज्ञान, भूगोल, संस्कृत, संगणक, सायन्स सेंटर, सायन्स ऍक्टिव्हिटी सेंटर अशा विविध विषयांच्या नावीन्यपूर्ण आणि अत्याधुनिक अशा स्वतंत्र प्रयोगशाळा आहेत. सबंध भारतातील विविध राज्यातून शालेय अभ्यासक्रमावर आधारित असे सर्व विषयांचे असंख्य मॉडेल्स प्रयोगशाळांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्ञानात आणि परीक्षेमधील गुणांमध्ये अपेक्षित वाढ करण्याकरिता याचा पुरेपूर उपयोग होत आहे.
याशिवाय विद्यार्थ्यांमध्ये संस्कारांचे रोपण लहान वयापासूनच व्हावेत आणि विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोनातून सर्वांच्या प्रति कृतज्ञतेचा भाव वाढीस लागावा, याकरिता शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या पालकांसाठी आणि सर्व शिक्षकांसाठी ऑनलाईन पद्धतीने संस्कार वर्गांचे नित्यनियमाने आयोजन केले जाते. याचेच फलस्वरूप मोशी या ठिकाणी झालेल्या ५१ व्या पिंपरी – चिंचवड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यालयातील इयत्ता आठवीची विद्यार्थिनी कुमारी समृद्धी दोरवे हिने जलसंवर्धन या विषयावर उत्कृष्ट वक्तृत्व सादर करून पूर्ण तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला. या यशस्वी विद्यार्थिनीने सदर प्रसंगी विज्ञान प्रदर्शनातील आपले अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले. या विद्यार्थिनीचा सदर उद्घाटन सोहळ्यात यथोचित सत्कार करण्यात आला आणि तिला भविष्यातील वाटचाली करिता शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यालयातील विज्ञान विषयप्रमुख श किसन आहिरे आणि या विद्यार्थिनीस मार्गदर्शन करणाऱ्या सुषमा संधान यांचेही सदर प्रसंगी अभिनंदन करण्यात आले. सचिव संजय जाधव तथा संचालक विजय जाधव यांनीही सर्व विद्यार्थ्यांचे आणि गणित तथा विज्ञान विषयशिक्षकांचे मन:पूर्वक कौतुक केले आणि प्रदर्शनाच्या यशस्वितेकरिता शुभेच्छा दिल्या.
सदर प्रसंगी प्रमुख पाहुणे नितीन लोणारी यांनी सर्व विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान प्रदर्शनाकरिता शुभेच्छा दिल्या आणि सदर प्रदर्शनाच्या उद्घाटनाची घोषणा केली. यानंतर सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांची पाहणी केली . विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे तथा त्यामागील कल्पनांचे मनःपूर्वक कौतुक करून त्यांचा उत्साह वाढवला. सदर कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळाराम पाटील, साहेबराव देवरे, उपमुख्याध्यापक किसन आहिरे, पर्यवेक्षक दत्तात्रय भालेराव, कोअर कमिटी सदस्या सुषमा संधान, छाया ओव्हाळ आणि मनीषा जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन क्रीडा शिक्षक श्री शब्बीर मोमीन यांनी, तर प्रास्ताविकपर मनोगत विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री दत्तात्रय भालेराव यांनी केले.













