ताज्या घडामोडीपिंपरी
श्रमश्री बाजीराव सातपुते यांचा ११ जानेवारीला अभीष्टचिंतन सोहळा

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने श्रमश्री बाजीराव सातपुते यांच्या सेवानिवृत्ती आणि एकसष्ठीनिमित्त अभीष्टचिंतनसोहळ्याचे आयोजन संकल्प गार्डन कार्यालय, आळंदी रोड, वडमुखवाडी, चऱ्होली येथे शनिवार, दिनांक ११ जानेवारी २०२५ रोजी करण्यात आले आहे.
आमदार महेश लांडगे यांच्या अध्यक्षतेखालील संध्याकाळी चार वाजता संपन्न होणार्या या सोहळ्याचे उद्घाटन ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस आणि ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते करण्यात येणार असून, टाटा मोटर्स लिमिटेडचे निवृत्त महाव्यवस्थापक मनोहर पारळकर, नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे आणि एस. के. एफ. एम्प्लॉईज युनियन अध्यक्ष सुनील आव्हाळे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहे. ‘एक झाड आईसाठी | एक झाड राष्ट्रासाठी ||ʼ या उपक्रमांतर्गत आई – वडिलांच्या हस्ते सकाळी दहा वाजता वृक्षारोपण करण्यात येईल. दुपारी १२:०० वाजता तळवडे येथील इंद्रायणी वृद्धाश्रमातील माता – पित्यांसाठी स्नेहभोजन होईल.
दुपारी ठीक ४:०० वाजता अभीष्टचिंतन सोहळ्यात बाजीराव सातपुते यांचा मान्यवरांच्या हस्ते मानपत्र देऊन गौरव करण्यात येईल. तसेच मधुमेहमुक्त भारत अभियानाचे पाईक डॉ. राजेंद्र माने, सेंद्रिय खते व वनस्पतीजन्य औषध निर्मितीसाठी संशोधन करून डॉक्टरेट प्राप्त करणारे डॉ. संभाजी सातपुते आणि अभिजात पाली भाषेचे प्रसारक अन् प्रचारक महेंद्र भारती यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे कार्याध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी दिली आहे.












