शौर्य -राष्ट्रभक्तीचे प्रतिक २०० फूट उंच भगवा ध्वज पिंपरी-चिचवडमध्ये दिमाखात फडकणार!
गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवप्रेमी, ग्रामस्थांच्या उपस्थितीत भूमिपूजन - भाजपा आमदार महेश लांडगे यांची संकल्पना, शिवप्रेमींमध्ये उत्साह

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भगवा ध्वज अखंड हिंदुस्थान, शौर्य, त्याग, बलिदान आणि स्वामिनाचे प्रतिक आहे. प्रभू श्रीरामांची, वैष्णव बांधवांची विद्वत्ता, महानता सांगणारे हिंदू धर्माचे निशाण आणि वारकरी सांप्रदायाची पताका आहे, असा भगवा ध्वज पिंपरी-चिंचवड शहरात दिमाखात व अभिमानाने फडकला पाहिजे, अशी समस्त वैष्णव बांधव, हिंदुत्ववादी संघटना, शिवशंभु प्रेमींची इच्छा होती. अखेर गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या मागणीला मूर्त स्वरूप प्राप्त झाले असून, चऱ्होलीतील थोरल्या पादुका मंदिराजवळ २०० फूट उंच भगवा ध्वज प्रत्येकाला हिंदू संस्कृतीचा, हिंदुत्ववादी जाज्वल्य अभिमानाचा संदेश देत राहील, अशा भावना भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केल्या आहेत.
चऱ्होलीतील थोरल्या पादुका मंदिराजवळ २०० फुटी उंच भगवा ध्वज उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले. यावेळी वारकरी संप्रदायातील विविध मान्यवर, थोरल्या पादुका मंदिर समितीचे पदाधिकारी, भाजपचे पदाधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, महाराष्ट्रातील लाखो वारकरी देहू-आळंदी-पंढरपूर पालखीमार्गावरून वारी करतात. या मार्गावर चऱ्होलीतील थोरल्या पादुका मंदिराजवळ संतसृष्टी उभारण्यात आली आहे. महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून या भक्ती मार्गावर वारकरी आणि हिंदू धर्माचे पवित्र निशाण असलेला भगवा ध्वज उभारला जात आहे. पिंपरी-चिंचवड शहराला संत परंपरा आणि वारकरी सांप्रदायाची विशाल परंपरा आहे. आळंदीतून दरवर्षी वैष्णवांचा मेळा पांडुरंगाच्या नामस्मरणाचा जयघोष करत पंढरपूरकडे मार्गक्रमण करतो. या पालखी महामार्गावर वैष्णवांच्या भक्तीसोबत हिंदुत्वाचे भगवे निशान फडकले जावे, अशी संकल्पना मांडली होती. त्यासाठी पाठपुरावा सुरू केला गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या संकल्पनेला मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे.
भारतीय हिंदू संस्कृतीची महिती सांगणारा त्याग, बलिदान, शौर्य आणि जाज्वल्य राष्ट्रभक्तीचे प्रतिक म्हणजे भगवा… भोसरी विधानसभा मतदार संघात सर्वांत उंच भगवा ध्वज थोरल्या पादूक मंदिर, चऱ्होली येथे उभारला जात आहे. हिंदू नववर्ष गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या निमित्ताने हा राष्ट्र-धर्मकार्य करताना आम्हाला विशेष अभिमान आणि आनंद वाटतो. श्रीक्षेत्र देहू-आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावर थोरल्या पादुका मंदिरासमोर २०० फूट भगवा ध्वज उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन सहकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. समस्त शिव-शंभू प्रेमी, हिंदूत्ववादी तसेच वैष्णव बांधवांचे मोठे स्वप्न साकारते आहे. यापुढील पिढ्यान पिढ्या हा ध्वज राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रधर्मासह शिवधर्माचे विचार अभिमानाने फडकवत राहील, असा विश्वास वाटतो.
– महेश लांडगे, आमदार भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.









