शिवाजीराव आढळराव पाटील यांनी भरला अर्ज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती

शिरूर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुण्यात जोरदार शक्ती प्रदर्शन करत शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिरूर मतदारसंघात आढळाराव पाटील यांचा विजय निश्चित असल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
लांडेवाडी येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज, मारुती आणि विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आढळराव यांच्या प्रचारफेरीला सुरुवात झाली. बालगंधर्व रंगमंदिर ते डेक्कन, या दरम्यान जंगली महाराज रस्त्यावर प्रचारफेरी काढण्यात आली. त्यानंतर डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळयास पुष्पहार अर्पण करून या फेरीची सांगता करण्यात आली.
त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार दिलीप मोहिते पाटील, महेश लांडगे, अतुल बेनके, चेतन तुपे, सुनील टिंगरे, माजी आमदार पोपटराव गावडे, विलास लांडे, योगेश टिळेकर यांच्या उपस्थितीत आढळराव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
केंद्रात तिसऱ्यांदा मोदी सरकार येणार आहे, मोदी सरकारकडून आपल्या भागाचा विकास करून घ्यायचा आहे.विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. त्यामुळे शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील निवडून येणार याचा मला पूर्ण विश्वास आहे. – अजित पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस













