शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चिंचवड विधानसभा प्रमुख प्रभारीपदी हरेश नखाते

शिवसेना उपनेते संजय राऊत आणि संपर्कप्रमुख सचिन अहिर यांच्या आदेशावरून निवड
चिंचवड विधानसभेत पक्षाला उभारी देण्यासाठी रात्रंदिवस झटणार – हरेश नखाते
हरेश नखाते यांच्या निवडीचे चिंचवड विधानसभेतील शिवसैनिकांचा जल्लोषात स्वागत
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरातील निष्ठावंत शिवसैनिक आणि उपशहरप्रमुख हरेश नखाते यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चिंचवड विधानसभा प्रमुख प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेचे उपनेते संजय राऊत आणि संपर्कप्रमुख सचिन अहिर यांच्या आदेशावरून ही निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने हरेश नखाते यांच्यावर ही महत्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. मावळ लोकसभा संघटक माजी महापौर संजोग वाघेरे पाटील, सह संपर्कप्रमुख केसरीनाथ पाटील, शहर युवा अधिकारी चेतन पवार या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हरेश नखाते यांनी प्रमुख प्रभारी पदाचा पदभार स्वीकारला.
यावेळी बोलताना हरेश नखाते म्हणाले की, राजकारण समजायला लागले तेंव्हापासून आजतागायत फक्त हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नेतृत्व स्वीकारून त्यांच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहिलो आहे. मध्यंतरीच्या काळात पक्षावर अनेक संकटे आली मात्र त्यावेळीही आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ राहिलो. आज त्याच निष्ठेचे फळ मला मिळाले आहे.
पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर विश्वास दाखवून जी जबाबदारी माझ्यावर सोपविली आहे, ती जबाबदारी निष्ठापूर्वक आणि प्रामाणिकपणे पार पाडेन. आणि आगामी काळात आपल्या पक्षाला उभारी देण्याचे काम करेन, असा विश्वास; हरेश नखाते यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, हरेश नखाते यांच्या निवडीचे शहरातील निष्ठावंत शिवसैनिकांनी जल्लोषात स्वागत करत नखाते यांना शुभेच्छा दिल्या आहेत.














