विद्युत अपघातात हात गमावलेल्या मुलीला पिं.चिं.इलेक्ट्रिकल असोसिएशन कडून मदतीचा हात!

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जे वय शिकण्या बागडण्याचे असते,त्या वयात एका लहान मुलीच्या अपेक्षांना पंख न लागता,तिच्या अपेक्षांवर नियतीने पाणी फेरले आहे.त्या मुलीला विद्युत अपघातात आपल्या उजव्या हाताला गमावण्याची वेळ आल्याचे पिंपरी चिंचवड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसियेशन चे कार्याध्यक्ष संतोष सौंदणकर यांना समजल्यावर त्यांनी संघटनेच्या पदाधिकारी यांना माहिती देऊन तिच्यासाठी माणुसकीचा हात पुढे करत तिला संघटनेमार्फत आर्थिक मदत केली.कमालीची गरीब आर्थिक परिस्थिती असलेल्या त्या मुलीला नव्वद हजार रुपयांची मदत करून असोसिएशन ने आपले सामाजिक कर्तव्य पूर्ण केले आहे.
देहूच्या येलवाडी भागातील आदिती जयवंत पवार,वय १४ वर्षे ही आपल्या पालकांसोबत मामाच्या मुलाच्या लग्नकार्यासाठी सुदवडी, ता.मावळ येथे गेले होते.सायंकाळी आठ वाजता आदिती मामाच्या घराच्या छतावर गेली असता,घराला स्पर्शून गेलेल्या विद्युत तारांच्या संपर्कात आली आणि तिच्या हाताला आणि पायाला भाजण्याने गंभीर दुखापत झाली.तदनंतर तिला तळेगाव आणि वायसीएम रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी इलाज करायला असमर्थता दर्शविली.त्यांनतर खासगी रुग्णालयात तिच्यावर इलाज करून तिचा हात निकामा झाल्याचे सांगत तिचा हात कट करावा लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.आदितीच्या पालकांची परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी कर्ज घेऊन उपचार केल्याचे असोसिएशनला कळले.त्यांनतर सगळ्या सभासदांनी मिळून आदितीला मदत करण्याचे निश्चित केले आणि शनिवार(ता.१५)रोजी तिला नव्वद हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचा चेक असोसिएशनतर्फे देण्यात आला.
सदर घटना घडून एक महिना उलटून गेला असून,महावितरणकडून कुणीही अद्याप विचारायला देखील आलेले नाही असे अदितीच्या पालकांचे म्हणणे आहे.सरकारी स्तरावर माणुसकी मेल्याचे हे लक्षण असून,महिन्याकाठी गलेलठ्ठ कमाई करणारे सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून अजूनही दुर्घटनेची दखलही घेतली गेलेली नाही.या सगळ्या प्रकारावर पांघरून घालून एकमेकांची कातडी वाचविली जाण्यापेक्षा आदीतीच्या आयुष्याला एकप्रकारे उद्ध्वस्त करणाऱ्यांवर कारवाई केली जाण्याची गरज आहे असे मत संघटना सचिव नितीन बोंडे यांनी व्यक्त केले आहे.यावेळी संघटना अध्यक्ष गिरीश बक्षी,उपाध्यक्ष मनोज हरपळे,जावेद मुजावर,संजय मोरे,महेश माने तसेच मानवाधिकार संघटना अध्यक्ष एम डी चौधरी आणि त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.













