राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना बदाम भेट

मुलींच्या मोफत शिक्षणासाठी केलेल्या घोषणेचा पडला विसर म्हणून पोस्टाने पाठवले बदाम
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्य महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या सूचनेनुसार पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने खोटारड्या आणि थापाड्या सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.शिक्षण मंत्री जे घोषणा करतात त्या घोषणेचा त्यांना विसर पडला की काय यासाठी त्यांची स्मरणशक्ती वाढावी म्हणून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने त्यांना निवेदन आणि त्यात बदाम पाठवण्यात आला आहे.
खरंतर 9 फेब्रुवारी रोजी चंद्रकांत दादा पाटील यांनी जी घोषणा केली होती की ज्या पालकाचे उत्पन्न वार्षिक आठ लाखापेक्षा कमी आहे त्या मुलींना बारावी नंतरचे उच्च शिक्षण मोफत देणार. महाराष्ट्रातील तमाम गरजू भगिनींच्या उच्च शिक्षणाच्या आशा पल्लवीत झाल्या. उच्च शिक्षणातील अभियांत्रिकी, वैद्यकीय, विधी, अशा विविध प्रकारच्या सध्याच्या 642 आणि नव्याने सुरु होणाऱ्या 200 अभ्यासक्रमांसाठी म्हणजेच जवळपास 850 अभ्यासक्रमांसाठी ही सवलत लागू राहणार असल्याचेही आपण स्पष्ट केले होते. परंतु अशा कोणत्याच प्रकारच्या योजनेची अंमलबजावणी झाली दिसत नाही .
याप्रसंगी राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष ज्योती निंबाळकर, प्रदेश सचिव आणि मा. उपमहापौर विश्रांती ताई पाडाळे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष स्वप्नाली आसोले, भोसरी विधानसभा अध्यक्ष सारिका हरगुडे, पिंपरी विधानसभा उपाध्यक्ष कल्पना घाडगे ,शहर उपाध्यक्ष रेखा मोरे, शहर समन्वयक जयमाला कदम, शहर सरचिटणीस ताहिरा बी सय्यद, विमल विटकर, पिंपरी विधानसभा उपाध्यक्ष कमल दाहिंजे ,सारिका कंडारे या महिला उपस्थित होत्या.









