‘बाप्पा आले…’ : लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – लाडके बाप्पा आज, शनिवारी गणेश चतुर्थीला विराजमान होणार आहेत. असे असले तरी शहरातील सार्वजनिक मंडळांच्या बहुतांश गणेशमूर्ती गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येलाच ढोल-ताशांच्या निनादात प्रतिष्ठापनेसाठी मंडपात दाखल झाल्या. आज विधिवत गणपती बाप्पा आसनस्थ होत असून घरोघरीही गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण आले आहे. दरम्यान, गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये गणेशभक्तांची अलोट गर्दी उसळली होती.
विघ्नहर्त्या बाप्पांचा गणेशोत्सव शनिवार दि. 7 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. गणेश चतुर्थीला सार्वजनिक गणेश मंडळांसह घरगुती बाप्पांची प्रतिष्ठापना होत आहे. लाडक्या बाप्पांच्या स्वागताची सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. मागील दोन दिवसांपासून सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्ती नेल्या जात आहेत. शुक्रवारीही सकाळपासूनच सातारा शहरात सार्वजनिक तसेच घरगुती बाप्पांच्या मूर्ती नेण्यासाठी गणेश भक्तांची वर्दळ सुरु होती. पारंपारिक वाद्याच्या दणदणाटात मंडळाचे बाप्पा मंडपाकडे रवाना होत होते.
गणेशमूर्ती नेताना बालगोपाळांचाही उत्साह दांडगा होता. अनेक सार्वजनिक मंडळांमध्ये प्रतिष्ठापनेची तयारी रात्री उशीरापर्यंत सुरु होती. शनिवारी सर्वत्र बाप्पांची षोडोपचारी पूजा होवून विधीवत प्रतिष्ठापना होणार आहे.
गणेश मूर्ती स्टॉलवर बाप्पांच्या आरती व भक्तीगीतांचा जागर सुरु होता. त्यामुळे बाजारपेठ गणेशमय होवून गेली होती. शहरासह जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीने ओसंडल्या आहेत. बाजारपेठांसह अवघ्या वातावरणातच गणेशोत्सवाचा उत्साह संचारला आहे. हा उत्साह पुढील दहा दिवस कायम राहणार आहे.













