पिंपरी चिंचवड साहित्य मंच आयोजित *शिवदर्शन* *श्री क्षेत्र चांगावटेश्वर, सासवड लेखन -माधुरी शिवाजी विधाटे

*पिंपरी चिंचवड साहित्य मंच आयोजित*
🕉️ *शिवदर्शन*🕉️
*श्री क्षेत्र चांगावटेश्वर, सासवड, ता.पुरंदर जि. पुणे*
*पंचम श्रावणी सोमवार*
*२ सप्टेंबर २०२४*
ब्रह्मदेवाच्या कमंडलूमधून निर्माण झालेल्या कऱ्हा नदीच्या तीरावरील सासवड नगरीत श्री क्षेत्र चांगावटेश्वर वसले आहे. नारायणपूर मार्गावरील या मंदिराचा कळस हिरव्यागर्द सृष्टीराणीच्या मुकुटातील हिरा शोभत आहे. तेराव्या शतकातील हे प्राचीन मंदिर आहे. चौदाशे वर्षे वयोमान असलेल्या श्री चांगदेवांनी या मंदिराची प्रतिष्ठापना केल्यामुळे चांगावटेश्वर म्हणतात. हिरव्याजर्द वनराजी मध्ये समोर भटार नावाचा ओढा आणि पाठीमागे खळखळून वाहणारी कऱ्हा नदी यांच्या जललहरींच्या संगीतात रंगलेले हे श्री क्षेत्र चांगावटेश्वर मंदिर बघताच मनात प्रसन्नतेच्या आनंद लहरी उचंबळू लागतात. सभोवताली भरभक्कम दगडी तटबंदी असलेल्या या पूर्वाभिमुख मंदिराच्या पायऱ्या चढून आत गेल्यानंतर मूळ काळ्या पाषाणातील हेमाडपंथी मंदिराचे सुशोभित दर्शन घडते. उत्कृष्ट वास्तुकलेचा आणि शिल्पकलेचा हा अप्रतिम वारसा आहे. नंदीमंडप ,सभामंडप आणि गर्भागार असे तीन भाग आहेत. यावर प्रत्येकी एक अशी अप्रतिम शिल्पवैभवानी नटलेली तीन शिखरे असून उपशिखरे देखील आहेत. निळ्या आकाशाच्या घुमटाखाली डौलाने उभे असलेले हे मंदिर शिल्प पाहून मन आश्चर्याने थक्क होते. आणि या मंदिराच्या स्थापत्यकारांविषयी आणि शिल्पकारांविषयी मनात कृतज्ञता भावना जागृत होते.
येथील नंदीमंडपात काळ्या पाषाणातील भव्य, डौलदार, प्रमाणबद्ध नंदी विराजमान आहे. या नंदीच्या देहावर पाषाणात कोरलेले अलंकार पाहून त्याकाळच्या सुखसमृद्धीची खूणगाठ पटते. नंदीमंडपाच्या ब्रम्हकांत प्रकारच्या स्तंभांवर शरभ शिल्प ,महिषासुरमर्दिनी शिल्प, शाखामृग, नर्तक, मयूर, कुस्तीगीर यांची सुंदर शिल्पे व पानाफुलांची वेलबुट्टी आहे. तसेच बसण्यासाठी दगडी आसने आहेत. डावीकडे श्रीगणेश मूर्ती आहे. मुख्य सभामंडपाच्या स्तंभांवर व छताच्या आतील घुमटावर सुंदर कोरीवकाम आहे. पाषाणातील भव्य कासवाचे पूजन करून लीनभावे गर्भागारात प्रवेश करतात.
प्राजक्त फुलांनी आणि बिल्वपत्रांनी सजलेली काळ्या पाषाणातील भव्य शाळुंका पाहून परमानंद लाभतो. येथील देवकोष्टामध्ये स्फटिकमय श्री गणेश विराजमान आहेत. पवित्र श्रावण मासा मध्ये रुद्राभिषेकाचे मंत्रोच्चार, ओंकाराचा प्रसन्न नाद, सुमनांचा सुगंध आणि धूपा दीपाचा सुवास यांनी कोंदलेल्या या गर्भगृहात शिवदर्शन घेताना असीम प्रसन्नतेची लाट मनाला स्पर्शून जाते.
प्रांगणात नंदीसह छोटेसे शिवमंदिर आणि तुळशी वृंदावन दिसते. या मंदिराला प्रदक्षिणा घालताना शिल्पवैभवाचा खजिना मंदिराच्या शिखरांवर ठायी ठायी कोरलेला दिसतो. मंदिराच्या कळसावर गजराजांच्या पाठीवरील सुबक गोपुरांमध्ये देवताशिल्पे व पानाफुलांची सुंदर नक्षी आहे. गोमुखातील तीर्थ प्राशून अर्धप्रदक्षिणा घालतात. नंदी मंडपाच्या डावीकडे आणि उजवीकडे अशा पंधरा मजली वरती शिखर असलेल्या सुबक दीपमाळांचे दर्शन घडते. यावर १२१ दीप उजळण्याची रचना केली आहे. श्रावणातील सोनेरी सूर्यकिरणात न्हात असलेल्या या दीपमाळांवर जणू सूर्य दीप उजळले आहे असा आभास होतो. याच प्रांगणात गंधभरल्या प्राजक्ताची पखरण झेलणारी सुंदर शिवलिंगे दिसतात.
मंदिराभोवती तटबंदी असून आत ओवर्या आहेत. जिने चढून वर गेल्यावर शिवकालीन टेहळणी बुरुज म्हणून वापरात असलेले सज्जे दिसतात .यावरून पलीकडच्या उंच उंच चिंचेच्या झाडांचे कोवळे आकडे हाताने तोडून खाता येतात आणि पुरंदर गडाचे आणि अवतीभवतीच्या घनगर्द परिसराचे विहंगम दृश्य दिसते. माझ्या माहेरच्या बालपणीच्या कितीतरी रम्य आठवणी या परिसराशी निगडित आहेत. परंतु आता पुरातत्व विभागाने हे जिने आणि तीर्थकुंडाकडे जाणारा जिना बंद केला आहे. कऱ्हातीरावरील तीर्थकुंडाचे व श्रीसंत सोपानदेव समाधी मंदिराचे आवारातून दर्शन घडते. यावर्षी धुवाधार पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे खळखळून वाहणाऱ्या कऱ्हामाईच्या प्रवाहाचे आणि तीर्थ कुंडा जवळ नैसर्गिकरित्या तयार झालेल्या धबधब्याचे दर्शन घेऊन खूपच प्रसन्न वाटले. मंदिरात घुमणारा शिवध्वनी ,केकारव ,पाऊसनाद आणि कऱ्हेच्या गूजगोष्टी ऐकायला आणि शिल्प वैभव पाहायला आणि शिवदर्शन घ्यायला इथे नक्कीच यायला हवे.
ओम नमः शिवाय
*®सौ माधुरी शिवाजी विधाटे.*
*सदस्य पिंपरी चिंचवड साहित्य मंच*
*नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ*













