पिंपरी-चिंचवड साहित्य मंच आयोजित *मुशाफिरी- भाग तेरावा*. * हंपी ,एक वैभवशाली शिल्पनगरी,भाग २ . लेखन- माधुरी शिवाजी विधाटे

*पिंपरी-चिंचवड साहित्य मंच आयोजित*
*मुशाफिरी- भाग तेरावा*
*लेखन- सौ. माधुरी शिवाजी विधाटे, पुणे*
*हंपी ,एक वैभवशाली शिल्पनगरी,भाग २*
*हंपी विजय विठ्ठल मंदिर*
🚩 *देवशयनी आषाढी एकादशी*🚩
निळेभोर आकाश, शिशिर ऋतूतील स्वच्छ आल्हाददायक हवा आणि ग्रॅनाईटमधील सुंदर मंदिरे पाहून स्वप्ननगरीत आल्याचा आभास होत होता.कर्नाटकमधील हंपी या वैभवशाली शिल्पनगरीमध्ये आम्ही विजय विठ्ठल मंदिरात आलो होतो. युनेस्कोने जागतिक वारसा क्षेत्र म्हणून घोषित केल्यामुळे प्रदूषण टाळण्यासाठी बॅटरी रिक्षाने यावे लागले.हे सोळाव्या शतकातील मंदिर असून तुंगभद्रा नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर स्थित आहे. दक्षिण भारतीय द्रविड मंदिर स्थापत्य शैलीतील हे मंदिर अद्भुत वास्तुकलेची साक्ष देत युगानुयुगे उभे आहे. पार्वतीने म्हणजेच पंपादेवीने शिवप्राप्तीसाठी इथे हेमकूट पर्वतावर तपश्चर्या केली होती. म्हणून शिवाला पंपापती व नदीला पंपा आणि या स्थानाला पार्वतीस्थळ म्हणून हेंप( हंपी) म्हणतात.
राजा कृष्णदेवराय (द्वितीय) यांच्या राजवटीत स्थापन झालेल्या या मंदिराचे महामंडप ,देवीमंडप, कल्याण मंडप, रंगमंडप ,उत्सवमंडप आणि पाषाण रथ असे स्वरूप आहे. मंदिर प्रवेशासाठी असलेली कलाकुसरीने नटलेली तीन भव्य गोपुरे व अप्रतिम शिल्प वैभवाने नटलेला हा परिसर पाहून मन प्रसन्न झाले.समोरच आयताकृती चौथऱ्यावरील दगडी रथाचे दर्शन घेतले. पुरातन काळात या रथाला दगडी फिरती चाके होती. आता संरक्षित वारसा म्हणून हा रथ एका ठिकाणी स्थिर केलेला आहे. या चौथ-यावर समर प्रसंगांचे चित्रण आणि चक्राकार कोरीव काम दिसले.या रथावर चढण्या साठी पूर्वी दगडी शिडी असून रथाला दोन अश्व जोडलेले होते. आता दोन महाकाय दगडी गजराज जोडलेले दिसतात. आपल्या महाराष्ट्रातील पंढरपूर मधील कटीवर हात ठेवून उभ्या असलेल्या पांडुरंगाच्या सुंदर मूर्तीचे रथावर दर्शन घडताच मन भक्तिभावाने नतमस्तक झाले. व पंढरीलाच आल्यासारखा असीम शांतीचा अनुभव आला. पायर्यां वरील हत्तींची सुंदर शिल्पे बघून महामंडपात प्रवेशलो.हा मंडप चौथर्यावर स्थित असून त्यावरील फुलांची मनमोहक वेलबुट्टी पाहून डोळ्यांचे पारणे फिटले. चौथर्याच्या तळामध्ये अश्वशिल्पांवर आरूढ घोडेस्वार दिसतात. आणि अश्व खरेदी करणारे पर्शियन, पोर्तुगाल ,अरब देशातून आलेले व्यापारी त्यांनी परिधान केलेल्या विविध आकारांच्या टोप्यांवरून ओळखू येतात.हा वैभवशाली इतिहास पाहून मन आश्चर्याने थक्क झाले.
त्यानंतर आम्ही या विष्णू विठ्ठल मंदिराच्या मुख्य मंडपात प्रवेशलो.इथे विष्णूचे दशावतार शिल्पबद्ध केलेले दिसतात. संगीत मंडपात केंद्रभागी भव्य स्तंभ व सभोवताली नाजूक स्तंभांची रचना असून त्यातून सप्तसूर उमटतात. वसंतोत्सव मंडपातील संगीत स्तंभांवर चंदनाच्या काठीने नाजूक आघात केल्यावर विविध संगीत वाद्यांचा नाद ऐकून मी आनंदविभोर झाले. स्तंभांवर वादक,गायक व नर्तकांची प्रमाणबद्ध शिल्पे आहेत. दक्षिण संगीतमंडपात कमलपुष्पांची वेलबुट्टी आहे. उत्तर मंडपात विष्णूचा नरसिंह अवतार कोरला असून छतावर कमलाकृती कोरीवकाम दिसते. शिल्पाचा एक भाग झाकला तर अश्व दुसरा भाग झाकला तर गजराज आणि एकत्रित पाहिले तर वेगळाच आकार अशी वैशिष्ट्यपूर्ण शिल्पे पाहून त्या पुरातन काळातील शिल्पकारांना आणि राजाश्रय देऊन ही अप्रतिम शिल्पनगरी वसवणाऱ्या या साम्राज्यातील अप्रतिम सौंदर्यदृष्टीच्या राज्यकर्त्यांना मी मनोमन वंदन केले व गर्भागारात प्रवेश केला.पण इथे विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती नसून तिथे दोन छोटे चबुतरे दिसले. पूर्वी त्यावर विठ्ठल-रुक्मिणीच्या सुंदर मूर्ती विराजमान होत्या असे मार्गदर्शकाने सांगितले. अल्लाउद्दीन खिलजी, मुहम्मद तुघलक यांच्या यवनी आक्रमणांपासून वाचवण्यासाठी या मंदिरातील पांडुरंगाची मूर्ती पंढरपूरला हलवली गेली अशी आख्यायिका आहे. कदाचित त्यामुळेच येथील दगडी रथावरील पांडुरंगाची मूर्ती आणि पंढरीची पांडुरंगाची मूर्ती यामध्ये कमालीचे साधर्म्य दिसते. इतिहासाच्या उदरात अज्ञात आश्चर्य दडलेली आहेत, याचे सत्य असत्य मात्र इतिहास संशोधकच सांगू शकतील. ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूनही समाधानकारक उत्तर मला मिळाले नाही.
मंदिराभोवतीच्या अरुंद प्रदक्षिणा मार्गात पाणी असून वटवाघळांच्या वावरामुळे तिथे जाता येत नाही.येथील शंभर स्तंभांवर आधारित कल्याण मंडपात धार्मिक विधी संपन्न होत असत. तसेच राजा व मंत्रीगणांसाठी बैठकीचा मंडप देखील आहे.
मी शिवदर्शन मालिकेतून लिहिलेल्या तीस शिवमंदिरांतील विखुरलेल्या शिल्प सौंदर्याचा ठेवा इथे एकत्रितपणे पाहायला मिळाला.अशा सर्वांगसुंदर, शिल्प वैभवसंपन्न मंदिराचे दर्शन घेऊन मन अगदी तृप्त झाले.
मंदिराच्या बाहेर दुतर्फा स्तंभ व चौथरे दिसले. तिथे पूर्वी हिरे ,माणके, रत्ने, दुर्मिळ जातींचे अश्व यांची विक्री होत असे. ते पाहून वैभवशाली ,सांस्कृतिक, धार्मिक, पौराणिक वारसा जपणाऱ्या साम्राज्याविषयीच्या अभिमानाने ऊर भरून आला. समोरच दिसणाऱ्या संत पुरंदरदास यांच्या समाधीतून ज्ञानेश्वर माऊलींच्या *कानडा वो विठ्ठलू कर्नाटकू* चे सूर कानावर पडले आणि भक्तिभावाने मन ओसंडून वाहू लागले.
*असा चालला सोहळा, पंढरीच्या या वारीचा*
*घोष पानाफुलांतून ,विठू नामाचा नामाचा*
अशा मी लिहिलेल्या भजनाचे सूर गुणगुणत येथील व्हिडिओ काढून स्मरणकुपीमध्ये एक सुंदर आठवण म्हणून मी जपून ठेवला आहे.
🚩 *राम कृष्ण हरी* 🚩
*लेखन- सौ माधुरी शिवाजी विधाटे*
*सदस्य पिंपरी-चिंचवड साहित्य मंच*
*नवयुग साहित्य आणि शैक्षणिक मंडळ*













