ताज्या घडामोडीपिंपरीमहाराष्ट्र

पिंपरी चिंचवड शहराला आंतरराष्ट्रीय पातळीवरचे वैभवशाली शहर बनविणार – आयुक्त शेखर सिंह यांचा मानस

Spread the love

महापालिका शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी पालकांचा सहभाग वाढवून विविध उपक्रम राबविले जात आहेत. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरणासाठी डी.बी.टी अंतर्गत ई-रुपी प्रणाली विकसित करण्यात आली आहे. औद्योगिक आस्थापनांना कुशल मनुष्यबळाची गरज असते. असे मनुष्यबळ सहज उपलब्ध व्हावे तसेच युवकांना रोजगार आणि स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी महापालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उत्पादनाभिमुख ट्रेड्सचे प्रशिक्षण देण्याचे काम अविरतपणे सुरु आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये इंग्रजी अध्ययन समृद्धी कार्यक्रम, मिशन शिष्यवृत्ती, शिक्षक सक्षमीकरण, सक्षम आदी उपक्रम राबविण्यात येत असून अध्यापनात विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची आवड निर्माण करण्यात येत आहे. तसेच विविध उपक्रमांद्वारे मुलांचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरु आहेत. महापालिकेने इंग्रजी माध्यमांच्या प्राथमिक तसेच माध्यमिक शाळा सुरू करण्यावर लक्ष केंद्रित केले असून जागतिक व्यवहाराची भाषा विद्यार्थ्यांना आत्मसात व्हावी तसेच भविष्यात विद्यार्थ्यांना आधुनिक जगाशी स्पर्धा करता यावी हा यामागचा उद्देश आहे.

महापालिकेच्या वतीने संत साहित्य तसेच संगीत शिक्षण देण्यासाठी चिखली येथे ‘संतपीठ’ विकसित करण्यात आले आहे. यामुळे आपल्या मातीत घडलेल्या संतांची ओळख होऊन मुलांच्या मनात साहित्याप्रती आदर वृद्धीगंत होण्यास मदत होत आहे. या शहराची जडणघडण करताना पारंपरिक संस्कृती जतन करत सांस्कृतिक, क्रीडा, कला, साहित्य परंपरा अधिक वृद्धींगत होण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका सातत्याने प्रयत्न करीत आहे.

सध्या पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या संख्येने नागरिक वास्तव्य करण्यास प्राधान्य देत आहेत. व्यावसायिक उपक्रमांमध्ये देखील विलक्षण वाढ होत आहे. या सर्व बाबींचा विचार करून दळणवळणासाठी रस्त्यांचे जाळे वाढवित असताना शहरातील विविध भागांत आधुनिक पद्धतीने रस्त्यांचा विकास करण्यावर भर दिला जात आहे. शहरातील दळणवळण सेवेमध्ये मेट्रोमुळे सार्वजनिक वाहतुकीला चालना मिळाली असून खासगी वाहनावरील अवलंबित्व कमी होण्यास मदत मिळाली आहे. पिंपरी ते निगडी या विस्तारित मेट्रो मार्गिकेचे काम सुरू झाले आहे. मेट्रोचे जाळे शहरभर पसरत असल्याने पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराचे विविध भाग जोडले जात आहेत.

पर्यावरणाच्या दृष्टीने हा महत्वाकांक्षी प्रकल्प ठरणार आहे. तसेच शहरातील नागरिकांना आरोग्यदायी वातावरण उपलब्ध व्हावे तसेच पर्यावरणपूरक जीवनमान अधिक उंचावण्यासाठी हरीतसेतू हा उपक्रम पथदर्शी ठरणार आहे. पर्यावरणपूरक साधनांचा प्रभावी वापर करून शहरभर पसरलेल्या हरित क्षेत्रांना एकमेकांना जोडल्यास शहराची पर्यावरणीय गुणवत्ता वाढून त्याचा लाभ शहरवासियांना व्हावा यासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरत आहे. प्रदूषण रोखण्यासाठी ई-वाहनांचा अधिक वापर करणे, ग्रीन बिल्डींगसारख्या उपक्रमांना चालना देणे, शहरातील ईव्ही ईको सिस्टीम सुधारण्यासाठी ईव्ही रेडिनेस आराखडा तयार करणे आदी शाश्वत विकासाच्या कामांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. शाश्वत विकास साधण्यासाठी सस्टेनेबिलीटी सेलसुद्धा सुरू करण्यात आली आहे. या बाबी शहरासाठी महत्वपुर्ण ठरणार आहेत.

महापालिकेच्या वतीने ‘वेस्ट टू वंडर’ ही संकल्पना राबविण्यात आली आहे. तसेच कचऱ्याची वीजनिर्मिती आणि बायोगॅस निर्मिती सारख्या प्रकल्पांमुळे शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास मदत मिळत आहे.

स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत शहरातील विविध भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून त्याद्वारे संवेदनशील भागांवर लक्ष ठेवणे सोपे झाले आहे. वाहतुकीचे नियमन तसेच कायदा व सुव्यवस्था आणि नागरी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ही यंत्रणा उपयुक्त ठरणार असून या सर्व प्रक्रियेवर नजर ठेवण्यासाठी इंटिग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटरची उभारणी करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड शहराला क्रीडानगरी म्हणून नावलौकिक मिळवून देण्याच्या दृष्टीने तसेच शहरातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. शहराला क्रीडाभूमी म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण करून देण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या वतीने शहरात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. शहरामध्ये हॉकी खेळाचा प्रचार, प्रसार आणि विकास करण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या वतीने नेहरूनगर येथे मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडीयम या ठिकाणी आंतरराष्ट्रीय हॉकी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. थेरगाव येथील व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अॅकॅडमीच्या माध्यमातून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण होत आहेत. तसेच शहरातील कुस्तीगीरांना प्रशिक्षण देण्यासाठी भोसरी येथे पै. मारुतराव लांडगे आंतरराष्ट्रीय निवासी कुस्ती प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले आहे. त्याचबरोबर याठिकाणी आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षण केंद्रही उभारण्यात आले आहे. या प्रशिक्षण केंद्रांमुळे खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण मिळत आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका व स्मार्ट सिटीच्या “पीसीएमसी स्मार्ट सारथी” या प्रकल्पाला केंद्र शासनाचा ‘ई-गव्हर्नन्स स्कीम २०२३-२४’ अंतर्गत डिस्ट्रीक्ट लेव्हल इनिशिएटीव्ह्ज इन ई-गव्हर्नन्स’ या श्रेणीमध्ये सिल्व्हर पुरस्कार मिळाला. पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित माझी वसुंधरा अभियानात गुणानुक्रमानुसार सर्वोत्तम ठरलेल्या १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये राज्यस्तरीय अमृत गटात पिंपरी चिंचवड महानगर पालिकेने प्रथम क्रमांक मिळविला आहे.

सध्या शहरामध्ये काही भागात निर्माण झालेली वाहतुक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने पोलिसांसमवेत समन्वय करून आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. निश्चितपणे या समस्येवर तोडगा काढून शहरातील दळणवळण व्यवस्था सुकर होईल अशी अपेक्षा आहे. हा वर्धापन दिन भविष्यातील आव्हांनावर मात करत त्यातून मार्ग काढून सर्वसामान्य नागरिकाच्या हितासाठी संकल्प करून उद्दिष्टपुर्ती सफल करण्यासाठी निश्चय करण्याचा महत्वपुर्ण दिवस आहे. शहरवासियांच्या साथीने येत्या काळात देखील राज्यासह देशाच्या जडणघडणीमध्ये आणि सर्वांगीण विकासामध्ये आपल्या शहराचे भरीव योगदान असेल असा मला विश्वास आहे.

‘कटिबद्धा जनहिताय’ हे ब्रीदवाक्य असलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रशासन आणि सुशासनाच्या दृष्टीने शहरवासियांना सहज आणि सुलभ पद्धतीने दर्जेदार सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लोकसहभागातून या वैभवशाली शहराला आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वव्यापी स्मार्ट शहर बनवण्याचा घेतलेला ध्यास निष्ठेने पुढे नेण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था तसेच शहरवासियांचे सहकार्य आणि योगदान निश्चितपणे मिळत असून ते यापुढेही कायम राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. महापालिकेच्या ४२ व्या वर्धापन दिनानिमित्त शहरवासियांना मन:पुर्वक शुभेच्छा देतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button