पावसामुळे तुंबणाऱ्या चेंबर्सची साफसफाई करावी जनसंवाद सभेत नागरिकांनी मांडल्या सूचना

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पावसाळ्याच्या अनुषंगाने महापालिका प्रशासन सतर्क असून आपत्कालीन परिस्थितीत महापालिकेची यंत्रणा घटनास्थळी पाहणी करून अनुषंगिक कार्यवाही करत आहे. पावसामुळे पाणी तुंबण्याची तसेच इतर आपत्कालीन समस्या उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा प्रकारची समस्या उद्भवल्यास नागरिकांनी महापालिका प्रशासनास त्वरित कळवावे, असे आवाहन आजच्या जनसंवाद सभेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
महापालिकेच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयांमध्ये आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी सहभाग घेऊन एकूण ७१ तक्रारवजा सूचना मांडल्या. यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अनुक्रमे १९, ८, ८, ३,४, ७, ११ आणि ११ तक्रारी वजा सूचना मांडल्या. पावसाळ्याच्या अनुषंगाने तुंबलेली गटारे तसेच ड्रेनेजसफाईसाठी आवश्यक ठिकाणी क्षेत्रीय स्तरावर पाहणी करून योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना समन्वयक तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी संबंधित विभागांतील अधिकारी- कर्मचाऱ्यांना दिल्या.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशानुसार सर्व क्षेत्रिय कार्यालयांत करण्यात येते. सभेचे अध्यक्ष तथा मुख्य समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेल्या महापालिका क्षेत्रीय कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांना महापालिकेच्या अनुषंगाने असलेली कामे, अडचणी, तक्रारी, सूचना या सर्व बाबींची नोंद घेऊन संबधितांना या बाबतीत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभेचे मुख्य समन्वय अधिकारी तसेच क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.
आज झालेल्या जनसंवाद सभेत विविध तक्रार वजा सूचना प्राप्त झाल्या. त्यामध्ये पावसामुळे तुंबणाऱ्या चेंबर्सची साफसफाई करावी, काल झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर सोसायट्यांमध्ये पाणी शिरले त्याबाबत आवश्यक उपाययोजना कराव्यात, पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा, शहरामध्ये आवश्यक ठिकाणी स्थळदर्शक, दिशादर्शक आणि मार्गदर्शक फलक लावावेत, रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात यावेत, नदीतील जलपर्णी काढावी, अनधिकृत जाहिरात फलक, होर्डिंग हटविण्यात यावेत आदी सूचनांचा प्रामुख्याने समावेश होता.
नागरिकांनी केलेल्या सूचनांची दखल घेऊन संबंधित समस्यांचा निपटारा करण्यासाठी महापालिका यंत्रणा कार्यरत असून क्षेत्रीय कार्यालयनिहाय सबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.













