पावसाळ्यापूर्वी प्रभाग १४ व १५ मध्ये (स्ट्रॉंम वॉटर लाईन) पावसाळी पाईपलाईन स्वच्छता व साफसफाई करावी – निखिल दळवी

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आकुर्डी परिसरात काल झालेल्या पावसामुळे बहुतांशी भाग पाण्याखाली गेला. प्रभाग क्रमांक १४ व प्रभाग क्रमांक १५ या दोन्ही प्रभागांमध्ये पावसाळ्यापूर्वी (स्ट्रॉंम वॉटर लाईन) पावसाळी पाईपलाईन स्वच्छता व साफसफाई करावी व दुरुस्त करावी अशी मागणी वारंवार करुनही महापालिका प्रशासन हतबल झाले . पावसाळी पाईपलाईन साफसफाई करणे व दुरुस्त करण्यात यावे अशी मागणी युवासेनेचे उपशहर प्रमुख निखिल दळवी यांनी आयुक्तांकडे केली आहे.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काल दिनांक २३ जून रोजी सांयकाळी झालेल्या धुवाधार पावसामुळे आकुर्डी, गंगानगर ,दत्तवाडी ,विठ्ठलवाडी, क्रांतीनगर, साईदर्शन नगर, तूळजाई वस्ती, भंगारवाडी ,पंचतारा नगर, गुरुदेव नगर या सर्व परिसरात बहुतांशी भाग हा कंबरे एवढा पाण्याखाली गेला होता. नागरिकांच्या घरात पाणी घुसले होते नागरिकांची फार तारांबळ उडाली होती.
प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना याचा मोठा फटका बसला आहे आकुर्डी मधील नाल्यालगतच्या सर्व परिसरामधील देखील नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे. येत्या २९ जून रोजी आकुर्डी परिसरामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पहिला मुक्काम आकुर्डी परिसरा मधील विठ्ठल रुक्मिणी मंदिर विठ्ठलवाडी या ठिकाणी आहे .त्या दरम्यान जर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर काल सारखी परिस्थिती निर्माण होईल. याचाही गांभीर्याने विचार करून प्रशासनाने पालखी येण्या अगोदर योग्य ते नियोजन व उपायोजना कराव्या जेणेकरून पालखी सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकरी व भाविक भक्तांना याचा कोणताही त्रास होणार नाही. प्रभाग क्रमांक १४ व प्रभाग क्रमांक १५ या दोन्ही प्रभागांमध्ये पावसाळ्यापूर्वी (स्ट्रॉंम वॉटर लाईन) पावसाळी पाईपलाईन स्वच्छता व साफसफाई करावी व दुरुस्त करावी यासाठी स्थापत्य विभाग अ.क्षेत्रीय कार्यालय निगडी यांच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार मागणी केली होती.
परंतु पावसाळी पाईपलाईन ची स्वच्छता झाली आहे व दुरुस्त करण्यात आली आहे असे आम्हाला स्थापत्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत होते. काल झालेल्या मोठ्या प्रमाणात पावसामुळे आकुर्डी दत्तवाडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असल्यामुळे (स्ट्रॉंम वॉटर लाईन) पावसाळी पाईपलाईन ची स्वच्छता साफसफाई करण्यात आलेली नाही व दुरुस्ती देखील करण्यात आलेली नाही हे निदर्शनास आले आहे. त्यामुळेच परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते .सदर परिसरातील (स्ट्रॉंम वॉटर लाईन) पावसाळी पाईपलाईनची साफसफाई व दुरुस्त केली असती तर नागरिकांना या पावसामुळे परिसरात साचलेल्या पाण्याचा त्रास सहन करावा लागला नसता सदर विषयाची गंभीर दखल घेऊन प्रभाग क्रमांक १४ व प्रभाग क्रमांक १५ मधील (स्ट्रॉंम वॉटर लाईन) पावसाळी पाईपलाईन त्वरित स्वच्छता साफसफाई करून ज्या ठिकाणी दुरुस्ती करण्याची गरज आहे व ज्या ठिकाणी नवीन टाकण्याची गरज आहे त्या ठिकाणी योग्य त्या उपाययोजना कराव्यात असे ही निवेदनात म्हटले आहे.













