जगताप डेअरी येथील दिघे कुटुंबाने साकारला अमरनाथ यात्रा मार्ग विलोभनीय देखावा

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – जगताप डेअरी येथील दिघे कुटुंबाने अमरनाथ यात्रा मार्ग हा देखावा केला असून भाविक हा देखावा पाहण्यासाठी गर्दी करत आहे.
सुनीता परशुराम दिघे, राहणार क्षितिज कॉलनी, जगताप डेअरी यांनी यावर्षी आपल्या घरी अमरनाथ यात्रा मार्ग हा अतिशय वास्तव देखावा साकारला आहे. याच्यामध्ये अमरनाथ यात्रा मार्गाचा नकाशा दाखवून त्याप्रमाणे हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे. श्रीनगर एअरपोर्ट दाखवून नंतर बसमार्गे पहलगाम व नंतर चंदनवाडी येथील बेस कॅम्प दर्शवला आहे. इथून पुढची सर्व यात्रा पायी करताना पिस्सु घाटी हा अतिशय चढणीचा मार्ग पार करून शेषनाग येथील हिमाच्छादित पर्वतरांगांचे मनोरम दर्शन घडते. वाटेत खळाळणारे जलप्रवाह, अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणि पंचतरणी बेस कॅम्प यांचे दर्शन घडते. अमरनाथ गुहे मधील बर्फाचे शिवलिंग, त्रिशूळ, डमरू पाहून मन थक्क होते. या सर्व देखाव्यामधील पर्वतरांगा, त्याच्यावरील बर्फवृष्टी, वाटेतली देवदाराचे उंच उंच वृक्ष, निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था, विमान,बसगाड्या अशी वाहन व्यवस्था तसेच यात्रा करणारे यात्रिक यांचे अतिशय हुबेहूब दर्शन त्यांनी घडवले आहे. हा देखावा पाहून प्रत्यक्ष अमरनाथ यात्रा केल्याचा आनंद मनाला वाटतो आणि प्रसन्नतेने मन भरून येते. शिव दर्शनासोबतच ज्येष्ठागौरी आणि कनिष्ठागौरी यांचे साजीरे दर्शन घेऊन हा आनंद द्विगुणीत होतो.
यापूर्वी देखील त्यांनी कर्दळीवन, केदारनाथ, गंगोत्री, कृष्णलीला, ग्रामीण आणि शहरी संस्कृती कोरोना महामारी अशा विविध विषयांवर देखावे साकारले आहेत. खास हे देखावे बघण्यासाठी इथे भाविक आवर्जून येतात. परशुराम आणि सुनीता दिघे हे दाम्पत्य आणि स्नेहा गायकवाड व शरयू टिंगरे या त्यांच्या दोन्ही कन्या यांची निरीक्षणशक्ती, कलात्मक दृष्टी आणि ईश्वरभक्ती यांच्या त्रिवेणी संगमातून हे मनोरम दर्शन भाविकांना घडते.









