चिंचवड विधानसभा मतदारसंघात विविध प्रकारची मतदान केंद्रे निश्चित

थेरगाव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने २०५ चिंचवड विधानसभा मतदार संघामध्ये महिला मतदान केंद्र, युथ मतदान केंद्र , अपंग मतदान केंद्र, युनिक मतदान केंद्र, मॉडेल मतदान केंद्र अशी मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिली.
२०५ चिंचवड विधानसभा मतदार संघात विविध प्रकारची मतदान केंद्रे निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडील निवडणूक शाखेमार्फत कळविण्यात आले होते. त्यानुसार चिंचवड मतदार संघामध्ये महिला मतदान केंद्र, युथ मतदान केंद्र , अपंग मतदान केंद्र, युनिक मतदान केंद्र, मॉडेल मतदान केंद्र अशी ५ प्रकारची मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहे.
तालेरानगर चिंचवड येथील मतदान केंद्र क्रमांक १४७ पोद्दार इंटरनॅशनल स्कूल येथे महिला मतदान केंद्र उभारण्यात येणार आहे. तसेच नवी सांगवी येथील बाबूरावजी घोलप माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय येथील मतदान केंद्र क्रमांक ४९९ येथे युथ मतदान केंद्र उभारण्यात येणार आहे. तर प्रेमलोक पार्क दळवीनगर येथील महात्मा फुले इंग्लिश मिडियम स्कूल येथील मतदान केंद्र क्रमांक ६६ येथे अपंग मतदान केंद्र उभारण्यात येणार असून पिंपळे सौदागर येथील पी.के. इंटरनॅशनल स्कूल येथील मतदान केंद्र क्रमांक ३५८ येथे युनिक मतदान केंद्र उभारण्यात येणार आहे. तर रावेत गाव येथील सिटी प्राईड स्कूल येथील मतदान केंद्र क्रमांक ४४ येथे मॉडेल मतदान केंद्र उभारण्यात येणार आहे.
२०५ चिंचवड विधानसभा मतदार संघात क्रिटीकल मतदान केंद्र, पडदानशिन मतदान केंद्र आणि निगेटिव्ह मतदान केंद्रे नाहीत. तर चिंचवड विधानसभा मतदारसंघाअंतर्गत येणारे सर्व ५६४ मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिली.













