ताज्या घडामोडीपिंपरीमहाराष्ट्र

गजानन बाबर यांच्या जीवनचरित्राचे शरद पवार, संजय राऊत यांच्या हस्ते प्रकाशन

Spread the love

 

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभेचे प्रथम‌ खासदार दिवंगत गजानन बाबर यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित ‘संघर्षयात्री’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार संजय राऊत यांच्या हस्ते सोमवारी (२६ फेब्रुवारी) सायंकाळी साडेपाच वाजता चिंचवड येथे संपन्न होणार आहे.

चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात होणाऱ्या या समारंभासाठी खासदार श्रीनिवास पाटील, अरविंद सावंत, डॉ. अमोल कोल्हे, आमदार सचिन आहिर, माजी आमदार विलास लांडे, मदन भोसले, महादेव बाबर, माजी महापौर आझम पानसरे, संजोग वाघेरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
‘किकली ते दिल्ली, व्हाया पिंपरी-चिंचवड’ असा खडतर प्रवास करत जवळपास ४५ वर्षांची राजकीय कारर्कीर्द गजानन बाबर यांनी यशस्वीपणे पूर्ण केली. शिवसेनेच्या माध्यमातून बाबर यांनी पिंपरी पालिकेचे तीन वेळा नगरसेवक म्हणून प्रतिनिधीत्व केले. या कालावधीत ते पालिकेतील विरोधी पक्षनेतेही होते. हवेली विधानसभा मतदारसंघातून ते सलग दोन वेळा आमदारपदी निवडून आले. मावळ लोकसभेची निर्मिती झाल्यानंतर मावळचे पहिले खासदार म्हणून गजानन बाबर यांची नोंद झाली. भुईंज (सातारा) येथील किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे संचालक तसेच उपाध्यक्ष म्हणून बाबर यांनी जवळपास १५ वर्षे समर्थपणे जबाबदारी पार पाडली. सातारा असो की पुणे, पिंपरी-चिंचवड, या संपूर्ण प्रवासात बाबर यांनी लोकहितासाठी व नागरी प्रश्नांसाठी शेकडो आंदोलने केली. बाबर यांचे संपूर्ण आयुष्यच संघर्षमय राहिले. राजकीय, सामाजिक पातळीवर बाबर कायम केंद्रस्थानी राहिले.
गजानन बाबर यांच्या जन्मापासून ते निधनापर्यंतच्या प्रवासाचा सविस्तर व सचित्र आढावा घेणारे हे पुस्तक प्रसिध्द करण्यात येत आहे. पुणेस्थित लेखक व पत्रकार तानाजी गोरे लिखित या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार तसेच संजय राऊत यांच्या हस्ते सोमवारी (२६ फेब्रुवारी) होणार आहे. यानिमित्ताने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, विविध संस्था, संघटना, बँकांचे प्रतिनिधी तसेच गजानन बाबर यांच्यासह संपूर्ण बाबर परिवारावर प्रेम करणारे असंख्य हितचिंतक या समारंभास उपस्थित राहणार आहेत.
———-

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button