कायदेविषयक जनजागृतीसाठी प्रभागस्तरावर ‘विधी सेवा केंद्रा’ची स्थापना – अॅड. गोरखनाथ झोळ

भारताच्या संविधानिक कसोटीवर भाजपा हा सर्वश्रेष्ठ पक्ष – प्रदेशाध्यक्ष अॅड. उदय डबले..
भाजपा कायदा आघाडीचा लोकप्रतिनिधी आणि गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा उत्साहात संपन्न..
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘कायदा आघाडी’ ही कोणत्याही राजकीय पक्षासाठी निर्णायक बाब आहे. संकटकाळात राजकीय पक्षाचं आस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी गुणी आणि ज्ञानी वकिलांची विचारसरणी मोलाची ठरते. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांनासुद्धा मोठ पाठबळ मिळतं. पक्षाला कायदेविषयक, निवडणूक विषयक सल्लाच नव्हे तर, पक्षाची ध्येय, धोरणे आणि जनमानसात त्याची छबी कशी उंचावेल? याची दिशा ठरविण्याचं कार्य कायदा आघाडीच्या वकिलांना पार पाडाव लागतं. भारतीय जनता पक्षाकडे गुणवंत वकिलांची मोठी फळी असल्यामुळेच भारताच्या संविधानिक कसोटीवर आज आपला पक्ष सर्वश्रेष्ठ पक्ष म्हणून गणला जातो. याच श्रेय निश्चितच भाजपाच्या कायदा आघाडीला जातं, असं प्रतिपादन भाजपा कायदा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अॅड. उदय डबले यांनी केलं.
पिंपरी चिंचवड शहर भाजपा कायदा आघाडीच्या वतीने भाजपा कायदा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष तथा निमंत्रक अॅड. गोरखनाथ झोळ यांच्या नेतृत्वाखाली नवनियुक्त लोकप्रतिनिधी, वकील बांधव, पत्रकार आणि दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा चिंचवड येथे शनिवारी (दि. ०३) रोजी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कायदा आघाडीच्या संपर्कप्रमुखपदी अॅड. एस. बी. चांडक, तर, प्रचार प्रमुखपदी अॅड. सुभाष चिंचवडे, राष्ट्रीय उपाध्यक्षपदी अॅड. व्हिक्टर पिंटो यांच्यासह कार्यकारिणीत नवीन वकिलांच्या निवड नियुक्त्या करण्यात आल्या. त्यांना नियुक्तीपत्राचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
या सोहळ्यात नवनियुक्त विधानपरिषद आमदार अमित गोरखे यांच्या वतीने मा. नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी सन्मान स्वीकारला. याशिवाय जेष्ठ विधिज्ञ एस. बी. चांडक, अॅड. सुभाष चिंचवडे, अॅड. व्हिक्टर पिंटो यांचा आणि वकील बांधवांच्या गुणवंत मुलांचा प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला. यावेळी कायदा आघाडीचे प्रदेश प्रभारी अॅड. धमेंद्र खांडरे, भाजपा राष्ट्रीय सदस्य सदाशिव खाडे, दक्षिण भारतीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड. मोरेश्वर शेडगे, पुणे पिं.चिं. अॅडव्होकेटस बार असोशिएशनच्या अध्यक्षा अॅड. प्रमिला गाडे, चिंचवड विधानसभा प्रमुख काळुराम बारणे, महिला अध्यक्षा अॅड. पल्लवी विघ्ने, अॅड. युवा अध्यक्ष हर्षद नढे, अॅड. रुपाली वाघेरे, अॅड. अमोल माने, सरचिटणीस दत्ता झुळूक, अॅड. गोरख कुंभार, चिटणीस अॅड. सोपान पाटील, अॅड. परेश नरोटे, अॅड. व्ही. जी. पोखरकर, अॅड. पूनम स्वामीप्रधान, अॅड. प्रशांत पल्हारे, अॅड. किरण धावडे, अॅड. अमित चौघडे, अॅड. सीमा लांडे तसेच मोठ्या संख्यने वकील बांधव, गुणवंत विद्यार्थी, कार्यकारिणी पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदाशिव खाडे म्हणाले, पिंपरी चिंचवड शहर भाजपमध्ये पुर्वी ठराविकच वकील होते. त्यामुळे राजकीय सल्ल्यांसाठी आमची गोची होत होती. खासगी वकिलांकडे सल्ल्यासाठी जावे लागे. पक्षाची आर्थिक स्थिती बेताची होती. भाजपच सरकार देशात आलं. त्यामुळे पक्षाच्या विचारसरणीमुळे नामांकित वकील पक्षात आले. कायदा आघाडी झाली. शहर भाजपा कायदा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष अॅड. गोरखनाथ झोळ यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची विधी संघटना मजबूत झाली आहे. पक्षाला वकिलांचा बहुमोल सल्ला आणि मार्गदर्शन मिळत आहे.
अॅड. धमेंद्र खांडरे मुलांना मार्गदर्शन करताना म्हणाले, ”वकिली व्यवसायामुळे वकिलांना स्वतःच्या मुलांना वेळ देता येत नाही. याचा अर्थ असा होत नाही की, मुलांकडे त्याचं लक्षच नाही. वकिलांनी आपल्या मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात त्यांना झोकून द्यावे. त्यांच्या कलागुणांना वाव द्यावा. मुलांनी देखील मोठ झाल्यावर आपल्या आई वडिलांना विसरू नये. आई वडिलांची सेवा ही ईश्वरापेक्षा कमी नाही. ज्ञानाचा फायदा समाजाच्या उन्नतीसाठी करा. मातृभूमीला विसरू नका. कोणत्याही क्षेत्रात जा तिथे प्रामाणिकपणे काम करा. भारत मातेचे खरे सुपुत्र असल्याचा आदर्श निर्माण करा.
अॅड. गोरखनाथ झोळ यांनी प्रास्ताविकात कायदा आघाडीची भूमिका विषद केली. कायदेविषयक जनजागृतीसाठी शिबीरं, केंद्राच्या कायदेशीर योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याच काम सुरु असल्याची माहिती दिली. तसेच आगामी काळात प्रभाग स्तरावर कायदा आघाडी सक्षम करण्यासाठी ‘विधी सेवा केंद्रा’ची स्थापना करून त्याद्वारे लोकांना न्याय देण्याचा मानस व्यक्त केला. त्यासाठी जवळपास सातशे वकिलांच संघटन तयार करीत असल्याचे सांगितले. संघटनेतील वकिलांच्या कामांची वरिष्ठांनी दखल घेऊन त्यांना पक्षाच्या राज्यस्तरीय चळवळीत सक्रीय करावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
जेष्ठ विधिज्ञ चांडक यांनी शहरात भाजपच्या कायदेशीर आघाडीचा विस्तार जोमात सुरु आहे. वकिलांना कार्यकारणीवर मोठ्या पदावर कामे करायला मिळत आहेत. त्यामुळे पक्षाला कायदेशीरपणे एखाद्या गोष्टीवर निर्णय घेता येत आहे. त्यासाठी वकील महत्वाचा दुवा बनत असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. दत्ता झुळूक, अॅड. पल्लवी विघ्ने यांनी तर, आभार अॅड. गोरख कुंभार यांनी मानले.









