“कवी हा समाजातील दुर्बल घटकांच्या वेदनांचा उद्गाता!” – पद्मश्री गिरीश प्रभुणे

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) ; “कवी हा समाजातील दुर्बल घटकांच्या वेदनांचा उद्गाता असतो!” असे विचार ज्येष्ठ साहित्यिक आणि समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी साधुराम मंगल कार्यालय, पुणे – नाशिक महामार्ग, मोशी येथे व्यक्त केले.
सेवानिवृत्त वायुसेना अधिकारी नामदेव हुले लिखित ‘वादळ’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन करताना गिरीश प्रभुणे बोलत होते. याप्रसंगी महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, शब्दधन काव्यमंचाचे अध्यक्ष सुरेश कंक, ज्येष्ठ साहित्यिक तानाजी एकोंडे, प्रकाशिका शामला पंडित – दीक्षित, कवी नामदेव हुले यांची व्यासपीठावर तसेच ज्येष्ठ साहित्यिक अरुण बोऱ्हाडे, अशोक गोरे, कामगारभूषण राजेंद्र वाघ, मुरलीधर दळवी, एकनाथ उगले, अलका हुले यांच्यासह केंद्रीय वायुसेना विभाग आणि साहित्यिक, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती.
गिरीश प्रभुणे पुढे म्हणाले की, “कवी नामदेव हुले यांची कविता ज्ञानोबा, तुकोबा, शिवबा आणि कबीर कुळाशी साधर्म्य साधणारी आहे. ‘वादळ’ या काव्यसंग्रहातील विषयवैविध्य स्तिमित करणारे आहे. समाजातील विसंगती अन् अनिष्ट प्रवृत्तींवर कवीने मिस्कील शैलीतून टीका केली आहे. त्यामुळे ती वाचकांना अंतर्मुख करते!” पुरुषोत्तम सदाफुले यांनी, “कवी जेव्हा अस्वस्थ होतो तेव्हा त्याच्याकडून अस्सल कवितेची निर्मिती होते!” असे मत व्यक्त केले. सुरेश कंक यांनी, “कवी नामदेव हुले यांनी फुलपाखराप्रमाणे अनेक विषयांमधून काव्यरूपी मकरंद गोळा केला आहे!” असे गौरवोद्गार काढले. तानाजी एकोंडे यांनी ‘वादळ’ या कवितासंग्रहाचे वैशिष्ट्य कथन केले. कवी नामदेव हुले यांनी आपल्या मनोगतातून, “शालेय वयातच लेखनाचा प्रारंभ झाला. वायुसेनेतील नोकरीच्या निमित्ताने संपूर्ण भारतभर भ्रमण केले; परंतु मायमराठी आणि गावाच्या मातीची नाळ कधीही तुटू दिली नाही!” अशी भावना व्यक्त केली. शामला पंडित – दीक्षित यांनी प्रास्ताविक केले.
अविनाश पिंगळे, सचिन बारसोडे, शुभम नाईक, डॉ. कविता पिंगळे, शशिकांत हुले, गोरक्ष पिंगळे आणि श्री मुक्तदेवी विकास संस्था – पुणे यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. नामदेव नाईक यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.













