विरोधक बॅकफूटवर! संदेश काटेंच्या घरोघरी संवादाने प्रभाग २८ ढवळून निघाला
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभाग क्रमांक २८ मध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संदेश रामचंद्र काटे यांनी काढलेल्या घरोघरी संवाद दौऱ्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. हातात पक्षाचा झेंडा, विकासाचा ठाम अजेंडा आणि जनतेशी थेट संवाद अशी भूमिका घेत संदेश काटे मैदानात उतरल्याने प्रभागात भाजपचा प्रचार निर्णायक टप्प्यात पोहोचल्याचे चित्र आहे.
या दौऱ्यात संदेश काटे थेट नागरिकांच्या दारात पोहोचले. त्यांनी केवळ मतांची मागणी न करता नागरिकांचे प्रश्न ऐकून घेतले. पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, स्वच्छता, वाहतूक कोंडी, तसेच प्रलंबित विकासकामांबाबत नागरिकांनी मोकळेपणाने आपली नाराजी व्यक्त केली. या प्रश्नांवर ठोस आणि वेळबद्ध उपाययोजना करण्याचा निर्धार काटेंनी व्यक्त केला.
“फक्त घोषणा नव्हे, तर काम करून दाखवणारे नेतृत्व प्रभागाला मिळाले पाहिजे,” अशी स्पष्ट भूमिका संदेश काटे यांनी मांडली. प्रत्येक संवादातून विकासाचा दृढ संकल्प आणि जनतेसाठी काम करण्याची ठाम निष्ठा दिसून आल्याने प्रचाराला धार आली आहे. नागरिकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, प्रभाग २८ मध्ये भाजपच्या बाजूने वातावरण झुकत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
या आक्रमक प्रचारामुळे विरोधकांची चांगलीच धावपळ उडाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विश्वास, सहकार्य आणि विकास या त्रिसूत्रीवर संदेश काटे यांची वाटचाल सुरू असून, प्रभाग २८ मध्ये “काम बोलते” या मुद्द्यावरच लढत रंगणार असल्याचे चित्र आता स्पष्ट होत चालले आहे.




















