पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक २६ मध्ये तुतारीचा आवाज दिवसेंदिवस अधिकच बुलंद होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या अधिकृत उमेदवार सारिका गणेश कस्पटे यांनी प्रचारात स्पष्ट आघाडी घेतली असून, त्यांच्या जनसंपर्क दौऱ्याला नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत आहे.
प्रचारादरम्यान सारिका कस्पटे यांनी प्रभागातील विविध भागांत घराघरांत जाऊन थेट संवाद साधला. पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, आरोग्य सुविधा, महिला सुरक्षितता, स्वच्छता आणि स्थानिक विकासकामे यासारख्या मूलभूत प्रश्नांवर त्यांनी ठोस भूमिका मांडली. “प्रभागातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे आणि नागरिकांना मूलभूत सुविधा देणे हेच माझे पहिले प्राधान्य असेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विशेषतः महिलांमध्ये आणि युवकांमध्ये सारिका कस्पटे यांना मोठा प्रतिसाद मिळत असून, त्यांच्या स्वच्छ प्रतिमेचा आणि कार्यतत्परतेचा फायदा प्रचारात होताना दिसत आहे. प्रचार फेरीदरम्यान तुतारीच्या निनादात कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. “तुतारी वाजणार, शिवसेना येणार” या घोषणांनी वातावरण भारावून गेले.
स्थानिक नागरिकांनीही कस्पटे यांच्या कामाची दखल घेत त्यांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला. संघटित कार्यकर्ते, मजबूत पॅनल आणि आक्रमक प्रचार यामुळे प्रभाग २६ मध्ये तुतारीचा सूर अधिक बुलंद होत असल्याचे चित्र आहे. येत्या निवडणुकीत सारिका गणेश कस्पटे या प्रभागात निर्णायक ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

















