पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २६ मध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून युवा वर्गाशी थेट संवाद साधत गणेश कस्पटे यांनी आपली विकासाभिमुख भूमिका ठळकपणे मांडली आहे. वाकड परिसरात आयोजित युवक संवाद मेळाव्यात कस्पटे यांनी तरुणांच्या प्रश्नांना थेट उत्तर देत, त्यांच्या अपेक्षा समजून घेण्यावर भर दिला.
या संवादात रोजगाराच्या संधी, कौशल्य विकास, स्टार्टअप्ससाठी स्थानिक पातळीवर सुविधा, खेळाचे मैदान, अभ्यासिका, डिजिटल सुविधा, तसेच परिसरातील पायाभूत समस्या यावर सखोल चर्चा झाली. “युवक हा केवळ मतदार नसून तो विकासाचा भागीदार आहे,” असे ठाम मत मांडत कस्पटे यांनी निर्णय प्रक्रियेत युवकांचा सक्रिय सहभाग असायलाच हवा, असे स्पष्ट केले.
प्रभाग २६ मधील वाहतूक कोंडी, रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा, तसेच सार्वजनिक जागांचा विकास या मुद्द्यांवर बोलताना कस्पटे यांनी नियोजनबद्ध आणि कालबद्ध कामांचा आराखडा युवकांसमोर मांडला. राजकारणात पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि कामातून विश्वास निर्माण करण्यावर आपला भर असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
यावेळी उपस्थित युवकांनीही आपले प्रश्न, सूचना आणि अपेक्षा मोकळेपणाने मांडल्या. “फक्त आश्वासन नको, प्रत्यक्ष कृती हवी,” अशी स्पष्ट भूमिका युवकांनी मांडत कस्पटे यांना पाठिंबा दर्शवला. संवादानंतर परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, युवक वर्गामध्ये गणेश कस्पटे यांच्याबाबत विश्वास वाढताना दिसत आहे.
एकूणच, प्रभाग २६ मध्ये युवकांशी साधलेला हा संवाद केवळ राजकीय कार्यक्रम न राहता, आगामी काळातील विकासाची दिशा ठरवणारा महत्त्वाचा टप्पा ठरल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
