Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २६ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने ताकद दाखवत प्रचाराचा बिगुल फुंकला आहे. आज आयोजित भव्य रॅलीमुळे संपूर्ण प्रभागात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक रणांगणात आक्रमक पवित्र्यात उतरल्याचे स्पष्ट झाले आहे.

या रॅलीला आमदार सुनील शेळके तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नाना काटे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. प्रभाग क्रमांक २६ मधील अधिकृत उमेदवार संकेत शामराव जगताप, सौ. सारिका गणेश कास्पटे, सौ. सीमा शिरीष साठे आणि तुषार गजानन कामठे यांनी रॅलीचे नेतृत्व करत मतदारांशी थेट संवाद साधला.
‘तुतारी वाजवणारा माणूस’ या राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक चिन्हाचे झेंडे, बॅनर आणि घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. विकास, पारदर्शक प्रशासन, मूलभूत नागरी सुविधा, पाणी, रस्ते, आरोग्य आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न हे या रॅलीतील प्रमुख मुद्दे ठरले. “विकासासाठी सक्षम नेतृत्व” अशा घोषणांनी रॅलीचे रूपांतर प्रभावी शक्तिप्रदर्शनात झाले.

यावेळी आमदार सुनील शेळके यांनी बोलताना सांगितले की, पिंपरी-चिंचवड शहराचा संतुलित आणि सर्वसमावेशक विकास करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध आहे. महापालिकेत मजबूत नेतृत्व आणि लोकाभिमुख कारभाराची आवश्यकता असून, राष्ट्रवादी काँग्रेसच हे देऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शहराध्यक्ष नाना काटे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जनतेशी जोडलेले, प्रामाणिक आणि काम करणारे नेतृत्व महत्त्वाचे असल्याचे सांगत, येत्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. जनतेचा वाढता प्रतिसाद हा परिवर्तनाचा संकेत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या भव्य रॅलीमुळे प्रभाग क्रमांक २६ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद आणि निवडणुकीतील तयारी स्पष्टपणे दिसून आली आहे. विरोधकांच्या गोटात या शक्तिप्रदर्शनामुळे हालचालींना वेग आला असून, येत्या काळात प्रभाग २६ ही निवडणुकीतील सर्वाधिक चर्चेची ‘हॉटसीट’ ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version