Spread the love

देहू, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३४० वा पालखी प्रस्थान सोहळा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला. तुकोबांची पालखी पारंपरिक रीतिरिवाज आणि अभंगगजरांच्या साथीनं पंढरपूरकडे प्रस्थान ठेवली आहे.

पावसाच्या सरींनी वातावरण अधिक मंगलमय केलं असून, आजचा मुक्काम इनामदार वाड्यात होणार आहे. उद्या पालखी पंढरपूरच्या दिशेने पुढे मार्गस्थ होणार असून, वारकऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहत आहे.
पालखी सोहळ्यादरम्यान ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’च्या जयघोषाने अवघं देहू भक्तिरसात न्हालं आहे. लाखो वारकरी भक्तीच्या ओढीने सहभागी झाले असून, पंढरपूरची वारी सुरू झाली आहे.

टाळ-मृदुंगाच्या गजरात हजारो भाविक देहूत दाखल झाले असून मोठ्या उत्साहात आणि भक्ती भावामध्ये तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले आहे. सोमवारपासूनच देहू नगरीत शेकडोच्या संख्येने वारकरी दाखल झाले होते. आज सकाळी इंद्रायणी नदीमध्ये पवित्र स्नान करून वारकऱ्यांनी तुकोबांचे दर्शन घेतलं. पहाटेपासून विधिवत पूजा, आरती नंतर या सोहळ्याची सुरुवात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाली.

यावेळी पालकमंत्री अजित पवार यांनी आधीच देहू मंदिरात भेट देऊन तुकोबांच दर्शन घेतलं. मावळ चे खासदार श्रीरंग बारणे, सुनेत्रा पवार, आमदार सुनील शेळके यांची देखील उपस्थिती होती. वर्षातून एकदा येणाऱ्या या आषाढी वारीसाठी देहू, आळंदीमध्ये हजारो वारकरी दाखल होतात. ज्ञानोबा-तुकोबाच्या गजरामध्ये देहभान हरपून टाळ-मृदंगाच्या तालावर स्वतःला झोकून देतात. फुगडी, भगवी पताका घेऊन एक- एक दिंडी मंदिरातून पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत आहे.

देहूतून बाहेर पडताच अनगडशहा बाबा या ठिकाणी पालखीची पहिली आरती होईल. ज्ञानोबा- माऊली तुकारामाच्या गजरात वारकरी पंढरपूरच्या दिशेने एक- एक पाऊल टाकतील. त्यानंतर जगतगुरु तुकोबांची पालखी उद्योगनगरी पिंपरी- चिंचवड शहरातील आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात मुक्कामी असेल.

 

Share.
Leave A Reply

Exit mobile version